कॉलेज रोडवरील धोकादायक गटारीभोवती बांबू
बेळगाव : मुसळधार पावसामुळे गटारीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने कॉलेज रोडवरील गटार फोडण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सदर गटारीची दुऊस्ती करण्यात आली नसल्याने पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात येताच समाजसेवक अवधूत तुडवेकर यानी सदर गटारीवर बांबू बांधले आहेत. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. महापालिकेकडून गटारिंची सफाई करण्यात न आल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे कॉलेज रोडवरील गटारीवर घालण्यात आलेले काँक्रीट फोडण्यात आले आहे. पण, त्यानंतर ते बुजवण्यात आले नसल्याने लोखंडी सळ्या धोकादायक स्थितीत आहेत. सदर पदपथावरून ये- जा करणाऱ्या पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला असल्याने त्या भोवती बांबू बांधण्यात आले आहेत.