For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News: माऊली कोकाटेकडून नयन कुमारला अस्मान

04:06 PM Aug 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
sangli news  माऊली कोकाटेकडून नयन कुमारला अस्मान
Advertisement

नेत्रदिपक लढतीने बांबवडे कुस्ती कमिटीचे रंगले मैदान

Advertisement

पलूस: बांबवडे कुस्ती मैदान कमिटीच्या वतीने आयोजीत कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटेने हरियाणाचा मल्ल रूस्तम ए हिंदकेसरी नयन कुमारला घुटना डावावर चितपट करून साडेसात लाख रूपये इनामाचा मानकरी ठरला. 

मैदानात खा. विशाल पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, प्रदीप कदम, प्रताप नाना पाटील, निलेश येसुगडे, यांच्यासह उदयोजकांनी हजेरी लावली. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत  नयन कुमारने दोनवेळा डाव उधळून लावला. अखेर माऊलीने हुशारीने नयन कुमारला घुटना डावावर चितपट केले.

Advertisement

दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत भारत केसरी माऊली जमदाडे व उत्तर प्रदेश केसरी बंटी कुमार यांच्यात चुरशीची लढत झाली. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत दिल्लीचा मल्ल आम आदमी केसरी मुन्ना उर्फ गब्बरला शाहू आखाडा कोल्हापूरचा मल्ल उमेश चव्हाणने एकचाक डावावर पराभूत करून वाहवा मिळवली.

चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत वीस मिनिटानंतर अभिजीत मोरेने आक्रमकपणे खालून डंकी लावून सुदेश ठाकूरला नमवले. याशिवाय मैदानात गौरव सपकाळने अतुल हिरवेला पराभूत केले. तर शुभम पवारने अमर क्षीरसागरला पराभूत करून चांदीची गदा आणि 1 लाख बक्षिसाचा मानकरी ठरला.

सत्यजित पाटील व नाथा चौगुले कुस्ती बरोबरीत सुटली. दयानंद शिरगाव (कर्नाटक) अशफाक तांबोळी यांच्या लढतीत तांबोळी सरस ठरला. सचिन मुळीकने बबलू मदनेला एक चाक डावावर चितपट केले. मैदानात गणेश शिंगाडे, प्रज्वल जगदाळे, शुभम गायकवाड, स्वप्नील जाधव, रविंद्र माने, राज बाबर, प्रणव कदम, रोहीत आंदर, अन्वीत जाधव, हर्षवर्धन कदम, प्रसाद नलवडे दगडू माने, पुडलिक खरात यांच्या चटकदार कुस्त्यांनी प्रेक्षकांच्या डोळयाचे पारणे फेडले. 

महिला कुस्त्याचे आकर्षण
बांबवडे कमिटीने आयोजीत केलेल्या कुस्ती मैदानात महिला कुस्त्यांचे आकर्षण ठरले. यामध्ये प्रेरणा पाटील वि. आराधना नाईक कुस्ती बरोबरीत सुटली. रिया भोसलेने पूजा लोंढे हिला लपेट डावावर पराभूत करून इनाम पटकावले.

Advertisement
Tags :

.