इराणमध्ये पोलीस मुख्यालयावर बलूच सशस्त्र गटाकडून हल्ला, 12 जण ठार
वृत्तसंस्था/ तेहरान
पाकिस्तानी सैन्य आणि चिनी नागरिकांवर हल्ले करणारे बलूच बंडखोर आता इराणसाठी देखील चिंतेचे कारण ठरले आहेत. इराणच्या सिस्तान-वा-बलुचिस्तान प्रांतात शुक्रवारी एका पोलीस मुख्यालयावर झालेल्या भीषण हल्ल्यात किमात 12 पोलीस मारले गेले आहेत. तर अनेक पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. बंडखोरांचा गट जैश अल-अदलचे सदस्य देखील कारवाईदरम्यान मारले गेल्याचे सांगण्यात आले आहे.
सिस्तान बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे. इराणच्या या प्रांतात सुन्नी मुस्लिमांची संख्या शिया मुस्लिमांच्या तुलनेत अधिक आहे. इराणमध्ये शिया मुस्लिमांचे सरकार असून सुन्नी मुस्लिमांचा याला विरोध आहे. याचमुळे या प्रांतात इराणचे सुरक्षा दल आणि सुन्नी मुस्लिमांदरम्यान संघर्ष होत असतो. बलूच गट वाढीव अधिकार देण्याची मागणी करत आहेत. या प्रांतात बलूच गटांनी अलिकडच्या काळात इराणच्या सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले आहेत. इराणच्या सैन्याच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत अनेक उग्रवादी मारले गेले आहेत. आता रास्क शहरातील स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा सिस्तानच्या डेप्युटी गव्हर्नरनी केला आहे.
जैश अल अदलने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलूच बंडखोर हे पाकिस्तानी सीमेत देखील हल्ले करत असतात. सीपीईसी प्रकल्प बंद करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. चीन बलुचिस्तानची राजधानी ग्वादारमध्ये स्वत:चा नौदल तळ स्थापन करू पाहत असून याकरता जमिनींवर कब्जा करत असल्याने बलूच लोक संतप्त झाले आहेत.