For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जलपर्णीतून बळ्ळारी नाल्याची सुटका कधी?

10:56 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
जलपर्णीतून बळ्ळारी नाल्याची सुटका कधी
Advertisement

सध्या शापित असलेला नाला भविष्यासाठी वरदान : जिल्हा प्रशासनाची मानसिकता बदलणे महत्त्वाचे

Advertisement

बेळगाव : बळ्ळारी नाला हा शेतकऱ्यांना दरवर्षीच नुकसानीचा ठरत आहे. या नाल्याच्या खोदाईसाठी अनेकवेळा कोटी रुपयांचा खर्च दाखविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात या नाल्याची खोदाईच झाली नाही. आता ड्रोनद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमुळे या नाल्याची झालेली दुरवस्था उघडकीस आली असून पाटबंधारे खाते आणि जिल्हाप्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. येळ्ळूर रस्त्यापासून हुदलीपर्यंत 14 कि. मी. चा असलेला हा बळ्ळारी नाला दरवर्षीच डोके दुखी ठरत आहे. या नाल्याच्या खोदाईसाठी अनेकवेळा प्रयत्न केले. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांनी मोठा निधी मंजूर करून घेतला. कामाला सुरुवात केली. मात्र काम पूर्ण झालेच नाही. काम पूर्ण झाले नसले तरी निधी मात्र पूर्ण खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले.

नाला परिसरातील पिकांचे दरवर्षीच मोठे नुकसान होत आहे. मात्र शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसानभरपाई ही तुटपुंजी आहे. येळ्ळूरपासून सुरू झालेला हा नाला मार्पंडेय नदीला जोडला जातो. या नाल्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले, जलपर्णी व झाडेझुडपे वाढली आहेत. विविध प्रकारचा गाळ या नाल्यामध्ये साचून आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे अशक्य आहे. सध्या ड्रोनद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांमधून या नाल्याची झालेली दुरवस्था स्पष्ट दिसून येत आहे. गेली 40 हून अधिक वर्षे या नाल्याची दुरवस्था झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे केवळ 14 कि. मी. च्या नाल्याची समस्या सोडविता येत नाही त्याच्या इतके दुसरे दुर्दैव कोणते? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Advertisement

दक्षिण कर्नाटकमध्ये अनेक जलाशय, नाल्यांची मजबूत बांधणी करण्यात आली आहे. त्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. गोवा येथील म्हादई नदीचे पाणी वळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी देखील मोठा खर्च करण्यात आला आहे. मात्र बेळगाव तालुक्यातील दरवर्षी डोकेदुखी ठरलेल्या या नाल्याचा प्रश्न सोडविता येत नाही. हे बेळगावच्या जनतेचे आणि शेतकऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, धामणे, बसवण कुडची, मुचंडी, सुळेभावी, हुदली त्यानंतर नाला  मार्कंडेय नदीला मिळतो. या नाल्याची सफाई केल्यास तसेच यामध्ये ड्रेनेज व दूषित पाणी सोडण्याचे बंद केल्यास या नाल्याचा सर्वांनाच फायदा होऊ शकतो. मात्र याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप होत आहे. भविष्याच्यादृष्टीने हा नाला महत्त्वाचा आहे. याचबरोबर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याऐवजी तो साऱ्यांनाच फायदाचा ठरणार आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हा नाला म्हणजे शेतकऱ्यांना एक शाप ठरला आहे. आता याकडे सरकार लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.

लेंडी नाल्यामुळे भविष्यात मोठा धोका 

नानावाडीपासून लेंडी नाल्याचा उगम होतो, तो शहरातून थेट बळ्ळारी नाल्याला जोडला जातो. मात्र या नाल्यावर अतिक्रमण झाले आहे. शेवटच्या टोकाकडे नाला केवळ चार ते सहा फुटाचा शिल्लक आहे. त्यामुळे त्यामधून पाण्याचा निचरा होणे अशक्यच आहे. शहरामध्ये 25 ते 30 फूट रुंद, शिवारामध्ये 10 ते 15 फूट रुंद, शेवटच्या टोकाला 4 ते 6 फूट रुंद नाला झाला आहे. नाल्याची रुंदीही 30 ते 35 फूट होती ती आता अतिक्रमणामुळे कमी झाली आहे. यामुळेच शास्त्राrनगर, मराठा कॉलनी, मंडोळी रोड, समर्थनगर परिसरामध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा या नाल्याचीही रुंदी व खोदाई होणे महत्त्वाचे आहे.

Advertisement
Tags :

.