बळ्ळारी नाल्याची स्वच्छता करावी
नेगिलयोगी रयत सेवा संघाची मागणी
बेळगाव : हलगा-मच्छे बायपासचे काम त्वरित बंद करून बळ्ळारी नाल्याची स्वच्छता करावी, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी नेगिल योगी रयत सेवा संघाच्यावतीने सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन करण्यात आले. हलगा मच्छे बायपासपासून पदयात्रा काढत शेतकऱ्यांनी सुवर्ण गार्डन आंदोलनस्थळ गाठले. राज्य सरकारविरोधात घोषण देत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
बेळगाव शहर परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन घेतात. परंतु मागील वर्षीपेक्षा यावर्षी भाताचा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. भात, सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. तसेच शेतकऱ्यांना मारक ठरलेले तीन कृषी कायदे त्वरित रद्द करावेत, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, उसाला 4500 रुपये भाव द्यावा, विद्युत विभागाचे खासगीकरण थांबवावे, यासह इतर मागण्या करण्यात आल्या.
बळ्ळारी नाल्यामुळे बेळगाव परिसरातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली जात आहे. यावर्षी शेकडो शेतकऱ्यांचे पीक वाया गेल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे नाल्याची स्वच्छता केल्यास पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल, याची दखल घेत राज्य सरकारने बळ्ळारी नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील, उपाध्यक्ष कल्लाप्पा हरियाळ, भाग्यश्री हणबर, वीरभद्र नायक, सुरेश वाली, जगदीश पाटील, प्रसाद कुलकर्णी, राजू मरवे यांच्यासह बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.