बळ्ळारी नाला शेतकऱ्यांसाठी गंभीर प्रश्नच
बळ्ळारी नाला गाळाने भरुन गवत वाढल्याने भातपिकाचे मोठे नुकसान : शेतकरी हवालदिल
वार्ताहर/धामणे
बळ्ळारी नाला हा शेतकऱ्यांसाठी गंभीर प्रश्नच कायम लागून राहिलेला आहे. यंदातरी हा बळ्ळारी नाला गाळाने भरुन या साचलेल्या गाळावर गवत आल्याने 35 ते 40 फूट रुंद असलेला नाला नाहीसा झालेला दिसत आहे. बेळगाव शहरालगत वडगाव, जुनेबेळगावपासून अवघ्या थोड्या अंतरावर असून या नाल्यातील गाळ काढून खोदाई करण्यासंदर्भात अनेकवेळा लेखी निवेदने देण्यात आली. अनेक मंत्र्यांच्या भेटी घेवून निवेदने दिली. परंतु आश्वासनाशिवाय या शेतकऱ्यांना काही मिळाले नाही.यंदातरी पालकमंत्र्यांनी या नाल्याच्या स्वच्छतेसाठी पाहणी केली आहे.
प्रत्येकवर्षी रोपलागवड तोट्याचे
हा नाला गाळाने भरल्यामुळे जरा जास्त पाऊस पडला की नाल्यातील पाणी नाल्याच्या दोन्ही बाजुच्या शिवारात पसरते. त्यामुळे येथील शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन पेरणी केलेले भातपीक कुजून बाद होवून प्रत्येक वर्षी जुनेबेळगाव, वडगाव व शहापूर येथील शेतकरी वैतागून गेले आहेत, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. एकदा या नाल्याला पूर आला की भातपीक बाद होते. पाणी कमी झाले म्हणून भात पिकाचे रोप लावले तर पाऊस जास्त झाला तर पुन्हा पूर येवून लावण्यात आलेली भात रोपे बाद होतात. प्रत्येकवर्षी दुबार रोपांची लागवड केली तरी महागाईमुळे परवडण्यासारखे नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
एक कि. मी.चा शेतीचा पट्टा नाल्याच्या पुराखाली
या बळ्ळारी नाल्यावर चार ते पाच फूट गाळ साचला आहे. त्यामुळे नाला आणि नाल्याच्या दोन्ही बाजुला शिवारात एक किलो मीटर रुंदीचा पट्टा येळ्ळूर रोडपासून ते कुडची, निलजी, सांबरा, सुळेभावीपर्यंतचा पट्टा हा बळ्ळारी नाल्याच्या पुराखालीसापडतो. भात पिकाची शेती पाण्याखाली प्रत्येक वर्षी पावसाळ्यात सापडत असल्याने शेकडो एकर शेतीतील भातपिकाला या भागातील शेतकऱ्यांना मुकावे लागत असल्याने या बळ्ळारी नाला परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नालाखोदाई आतापासून करणे गरजेचे
यंदा पाऊस सुरू असतानाच बेळगाव जिल्हा पालकमंत्र्यांनी स्वत: या बळ्ळारी नाल्याची पाहणी केली आहे. निदान पावसाळा संपताच या बळ्ळारी नाल्याची खोदाई करून घेण्यासाठी आतापासूनच पाठपुरावा करावा आणि पावसाळा संपताच या बळ्ळारी नालाखोदाईच्या कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा येथील शेतकरी बाळगून आहेत.