Solapur Politics : बळीराम काका साठे यांचा निर्णय... राजकीय समतोल अन् राजकारणाला कलाटणी !
सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे राष्ट्रवादीत प्रवेश
by दत्ता मोकाशी
उत्तर सोलापूर : गेली सहा दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा भाडसी निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय राजकीय समतोल साथणारा आणि जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. पुरोगामी विचारांचे समर्थन करणाऱ्या बळीरामकाका साठे यांनी तब्बल साठ वर्षे देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून राजकीय प्रवास केला.
ज्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष होण्यासाठी कोणी धजत नव्हते अशा अडचणीच्या काळात वडाळ्याच्या काकांनी बारामतीच्या काकांना साथ दिली. जिल्ह्यात पक्षाला चांगले राजकीय वजन प्राप्त करून दिले. मात्र पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या अपरोक्ष जिल्हाध्यक्ष पदावरून त्यांची गच्छंती केली. तेव्हा बंडाचे निशाण फडकविल्यावर दोनवेळा खा. पवार यांच्याकडून वेगळा विचार करु नका म्हणून सांगण्यात आले. मात्र त्यातून काहीच साध्य झाले नाही.
काका साठे यांच्यासारख्या ज्येष्ठ, निष्कलंक चारित्र्य असलेल्या नेत्याला भारतीय जनता पार्टी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पक्षात येण्यासाठी बोलावणे आले. मात्र काकांनी भावनेच्या आहारी जाऊन निर्णय न घेता थांबा, पहा,जा या वाहतुकीच्या नियमाचे पालन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अतिशय निकटवर्तीय असलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नेमकी योग्य परिस्थिती पाहून
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी ना. अजितदादा आणि काका साठे यांचे थेट बोलणे करून काकांचा पक्षातील प्रवेश निश्चित केला आणि अजितदादांनी देखील स्वतः वडाळा येथे येऊन सन्मानाने काकांना पक्षात घेतले. १९६७ साली खा. शरद पवार यांनी देखील बार्शीच्या सभेला जाताना वडाळा गावी येऊन काका साठे यांना भल्या सकाळी झोपेतून उठवून सोबत घेतले आणि तिथूनच काकांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. ५८ वर्षांनंतर पुन्हा तीच पुनरावृत्ती झाली. दस्तुरखुद्द अजितदादा वडाळा गावात आले आणि काका साठे यांना सन्मानाने पक्षात घेतले.
काका साठे यांनी पक्षांतर केले मात्र पवार कुटुंबाशी असलेली पुरोगामी विचारांची नाळ तुटू दिली नाही. हा त्यांनी राजकारणात समतोल साधत तोंडसुख घेणाऱ्यांना चेकमेट दिले आहे. त्यांचा हा निर्णय म्हणजे बुद्धीबळाचा डावच टाकला असल्याचे जाणकारांचे मत आहे.
दुसरीकडे काका साठे यांचे वैचारिक साम्य असलेले माजी सहकारमंत्री कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी पद्मजादेवी मोहिते-पाटील, चिरंजीव डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे देखील ना. अजितदादांच्या पक्षात आले. माजी आमदार संजयमामा शिंदे हे देखील ना. अजितदादांशी जवळीक ठेवून आहेत.
इतकेच नाही तर काकांच्या जिल्हा अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत निवडून आलेल्या शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही आमदार देखील थेट अजितदादांच्या संपर्कात आहेत. सहाजिकच काका साठे, उमेश पाटील यांचा असाच झंझावात राहिला तर जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळायला वेळ लागणार नाही. सहाजिकच काका साठे यांचा हा राजकीय निर्णय काकांना विरोध करणाऱ्यांना चेकमेट देणारा, समतोल साधणारा आणि जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा असाच झाला आहे.