अनिश्चित दर-काटामारीमुळे बळीराजा हतबल
कडोली भागातील चित्र, काटामारी रोखण्यासाठी हवे ठोस पाऊल : तब्बल 1500 रुपयांनी दर कपात, अर्ज-निवेदनांना केराची टोपली
वार्ताहर/कडोली
कडोली भागातील सध्या सुगीचा हंगाम जोरदार सुरू आहे. दरम्यान या साऱ्या घाईगडबडीत परिसरातील शेतकरी चक्रव्युहात अडकल्याचे दिसून येत आहे. काटामारी, दराची अनिश्चिती व अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांना शेती नको असेच वाटत आहे. मागीलवर्षीपेक्षा यावर्षी इंद्रायणी भातपीक दर तब्बल 1500 रुपयांनी घसरले असून याबाबत शेतकरी संघटना व कडोली परिसरातून जिल्हाधिकारी व संबंधित कृषी अधिकाऱ्यांना निवेदने, अर्ज विनवणी, आंदोलने करण्यात आले. मात्र त्यांनी याला केराची टोपली दाखविल्याचा आरोप होत आहे.
कडोली परिसरात सध्या सुगीसह मळणीच्या कामांना वेग आला असून मजुरांची टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाला आलेले भातपीक वाया जाते की काय? ही भीती होती. भाताचा दर तब्बल 1500 रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यासाठी शेतकऱ्यांनी रुपरेषा आखली आहे. मागीलवर्षी काटामारी करणाऱ्या भात व्यापाऱ्यांना कडोली परिसरातील शेतकऱ्यांनी चांगलाच धडा शिकविला होता. याची तक्रार व संबंधित व्यापाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली होती. अशा परिस्थितीत कृषी खात्याचे कामही आता शेतकरी करत असताना सरकारकडून आता योग्य तो हमीभाव मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.
अधिकारी-लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
सध्या पावसामुळे उघडीप दिल्याने कडोली परिसरातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या इंद्रायणी भाताची सुगी जोरात सुरू आहे. यावर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने माळरानातील बटाटा पीक वगळता भातपिकाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळणार आहे. या आशेने शेतकरी राजा खुशीत होता. बटाटा पिकातील नुकसान भरपाई भात पिकात भरुन निघेल, अशी शेतकऱ्यांची आशा होती. पण या आशेवर विरजण पडल्याने शेतकरीवर्ग नाराज झाला आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतकऱ्यांवर संकट ओढवत असून विकासाचे गाजर दाखविणारे लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
भात दरातही कमालीची घसरण
मागीलवर्षी भाताला एका क्विंटलमागे 3500 रुपये ते 3600 रुपये दर मिळत होता. परंतु पावसाअभावी उत्पादन कमीत होते. यावर्षी उत्पादन समाधानकारक आहे. भातसुगीच्या कामांना आता जोरात सुरुवात झाली आहे. मजुरांची टंचाई जाणवत आहे. शिवाय मजुरीची मागणीही वाढत आहे, असे असताना भात दरातही कामालीची घसरण करण्यात आली आहे. क्विंटलमागे 1500 रुपये घसरण झाल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. आता हा दर पाहता खर्च आणि उत्पादन यांचा ताळमेळ बसेना. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. शिवाय गेल्या दोन-तीन वर्षांपासून वजनकाट्यातील काटामारीचा प्रश्न भेडसावीत आहे. वजनकाट्यांची तपासणी व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे दाद मागितली. पण याकडे अद्याप लक्ष दिले गेले नाही. एकंदरीत चोहोबाजुनी शेतकऱ्यांची गळचेपी होत असून याकडे अद्याप कोणाचेही लक्ष गेले नाही. तेंव्हा शेतकऱ्यांनीच संयमाची भूमिका घेवून भातविक्री थांबविली तर काहीतरी साध्य होणार आहे.
किमान 3000 रु.दर द्यावा
शासनाने भाताला 2300 रुपये आधारभूत दर ठरवून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. तर चालू घडीला व्यापाऱ्यांनी 2000 ते 2100 रुपये दर देवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू केला आहे. भात उगवणीपासून ते खरेदीपर्यंत हा दर पाहता शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आर्थिक कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना या दरामुळे जीवन संपविणे सोपे वाटत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
वजनकाट्यांची तपासणी करून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्यावी
शेतकऱ्यांच्या मागण्यांना शासनाने केराची टोपली दाखविली आहे. अनेकवेळा निवेदने, आंदोलने केली तरी शेतीमालाला योग्य दर मिळत नाही. वजनकाट्यांची तपासणी करावी व याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी. अनेकवेळा शेतकऱ्यांना काहीच हाती लागत नाही, ही आपल्या देशाची शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.
- आप्पासाहेब देसाई, तालुका रयत संघटना अध्यक्ष
शासनाने विचार करून भाताला किमान 3000 रुपये दर द्यावा
प्रत्येक शेतीमालाला शासनाने दर ठरवून दिलेला आहे. बियाणे, खते, औषधे, अवजारे या शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तुंना दर निश्चित ठरविलेला असतो. पण शेतकऱ्यांकडून उत्पादन घेणाऱ्या शेतीमालाला मात्र दर ठरविला जात नाही. ही फारमोठी अन्यायकारक बाब आहे. यावर शासनाने विचार करून भाताला किमान 3000 रुपये दर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
- सुभाष धायगोंडे (रयत संघटना नेते)