बालिंगा- चंबुखडी मुख्य पाईपलाईन फुटली
कोल्हापूर :
बालिंगा उपसा केंद्र ते चंबुखडी उपसाकेंद्रामधील मुख्य वितरण नलिका शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास फुटली. यामुळे शनिवारी शहरातील सी आणि डी वॉर्डमधील संपूर्ण पाणीपुरवठा तर ए आणि बी वॉर्डमधील काही भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. शनिवारी दिवसभर या भागात पाणीपुरवठा होवू शकला नाही. यामुळे नागरीकांची पाण्यासाठी धावपळ झाली.
बालिंगा ते चंबुखडी उपसा केंद्रास पाणी पुरवठा करणारी मुख्य वितरण नलिका शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास फुटली. शेतवडीमधून जाणारी ही नलिका फुटल्यामुळे शनिवारी सकाळी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र मुख्य लाईनच फुटल्यामुळे कामामध्ये अडथळे निर्माण होत हेते. यानंतर चंबुखडी आणि बालिंगा येथील पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर काम हाती घेण्यात आले. शनिवारी सायंकाळी उशिरा पाईप लाईनच्या गळतीचे काम पुर्ण करण्यात आले. मात्र शुक्रवारी रात्री पासून शहरातील सी आणि डी वॉर्डमध्ये तर शनिवारी सकाळी ए आणि बी वॉर्डमधील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहिला. शनिवारी मध्यरात्री 12 नंतर शहरातील सर्वच भागात सुरळीत पाणीपुरवठा झाला. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून पाणी पुरवठा सुरळीत राहिला.