बाकनूर मराठी शाळेची इमारत बनली धोकादायक
इमारतीला लागली गळती : विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका : प्रशासनाचे दुर्लक्ष : पालकवर्गातून तीव्र संताप
आण्णाप्पा पाटील/बहाद्दरवाडी
बाकनूर गावातील प्राथमिक मराठी शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीला गळती लागली आहे. त्यामुळे इथल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाचे या शाळेकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी पालकवर्गातून व्यक्त होत आहेत. प्रशासन दरबारी अनेकवेळा दाद मागूनही आपल्या गावातील शाळेकडे कोणी लक्ष देत नाही. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील शैक्षणिक जीवनाचा मुख्य पाया आहे. प्राथमिक शिक्षण चांगल्या दर्जाचे व्हावे, विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शिक्षण खात्याकडून योजना राबविल्या जातात. पण शाळेच्या इमारतीकडेही शिक्षण खात्याने लक्ष देण्याची गरज या बाकनूर गावातील शाळेची अवस्था पाहिल्यास निर्माण झालेली आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने माध्यान्ह आहार, दूध, अंडी, केळी दिले जातात. त्यांना मोफत पाठ्यापुस्तके, बूट, गणवेश दिला जातो. यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीस्कर ठरलेले आहे. मात्र चांगल्या इमारती, त्यांना योग्यप्रकारचे शौचालय याकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील बाकनूर गावातील विद्यार्थ्यांचे आरोग्य टांगणीला आले आहे. कारण शाळेच्या चार खोल्यांना गळती लागली आहे. यामुळे पावसाचे पाणी या वर्गखोल्यांमध्ये पडत आहे. अशा ठिकाणीच त्यांना बसून शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. त्यामुळे पालकवर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गळतीच्या ठिकाणीच बसताहेत विद्यार्थी
या गावातील शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. पटसंख्याही 98 इतकी आहे. मात्र या शाळेच्या इमारतीला गळती लागली असल्यामुळे विद्यार्थी गळतीच्या ठिकाणी बसत आहेत. त्यामुळे त्यांना आजार होऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. आता या शाळेला आपल्या मुलांना पाठवून द्यायचे की नाही, असा प्रश्न पालकवर्गांमध्ये निर्माण झालेला आहे. कारण शाळेच्या इमारतीला गळती लागल्यामुळे खोली कोसळल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
स्लॅबमधील लोखंडी सळ्या-खडी निखळली
1998 साली शाळेच्या मुख्य इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. हे बांधकाम 2001 साली पूर्ण करण्यात आले. यावेळी चार वर्गखोल्या बांधण्यात आल्या होत्या. या चारी वर्गखोल्यांना गळती लागली आहे. त्यामुळे स्लॅबमधील लोखंडी सळ्या बाहेर पडलेल्या आहेत. तसेच स्लॅबची खडीही वर्गामध्ये पडत असल्याची माहिती पालकांनी व एसडीएमसी कमिटीने दिली. याचबरोबर 2013 साली अन्य एक वर्गखोली बांधण्यात आली. ही वर्गखोली बऱ्यापैकी आहे. या वर्गखोलीमध्ये दोन वर्ग बसविण्यात येतात गळती लागलेल्या वर्गखोलीत पाच वर्ग बसविण्यात येतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना या पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. 2023 साली शाळेच्या बाजूलाच शौचालय बांधण्यात आले. मात्र या शौचालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. या शौचालयाचे दरवाजेही व्यवस्थित बसविण्यात आले नाहीत. आपण याबद्दल ग्रामपंचायतीला अनेकवेळा विचारणा केली आहे. तरीही याकडे दुर्लक्ष झाले आहे, असेही एसडीएमसी कमिटीने सांगितले.
शिक्षण खाते गांभीर्याने लक्ष देईल का?
शिक्षण खात्याकडून तालुक्याच्या दुर्गम भागातील शाळांची पाहणी होते की नाही, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. प्रशासनामार्फत शिक्षण खात्यासाठी विविध प्रकारच्या योजना आहेत, असे सांगितले जाते. मात्र बाकनूरसारख्या गावातील विद्यार्थ्यांना गळती लागलेल्या इमारतीत बसून शिकावे लागत आहे. याकडे शिक्षण खाते गांभीर्याने लक्ष देईल का?
लोकप्रतिनिधीनी समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामपंचायतीवर मोर्चा
शाळेच्या इमारतीला गळती लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. एखादा मोठा अनर्थ घडल्यास त्याला जबाबदार कोण? प्रशासनाचे या शाळेकडे दुर्लक्ष झाले आहेत. 2023 साली बांधलेल्या शौचालयाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. सदर शौचालय बांधण्यात आलेल्या कंत्राटदाराला जाब विचारण्याची गरज आहे. यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यायला हवा. शौचालय इमारतीचे कामकाज निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याबद्दल ग्रामपंचायतीला सांगूनही कानाडोळा करण्यात आला आहे. येत्या पाच-सहा दिवसात ग्रामपंचायत अध्यक्ष व पीडिओ यांना याबाबत आपण जाब विचारणार आहोत. जर स्थानिक लोकप्रतिनिधी या समस्यांकडे दुर्लक्ष करत असतील तर आपण ग्रामपंचायतीवर मोर्चा काढणार आहोत.
-रवळू गोडसे -एसडीएमसी अध्यक्ष