बैलहोंगलला जिल्हा केंद्राचा दर्जा द्यावा
सर्वपक्षीय नेते-मठाधीशांचा दबाव, अन्यथा असंतोष भडकण्याचा इशारा
बेळगाव : कोणत्याही परिस्थितीत अखंड बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करू नये, जिल्हा विभाजन अनिवार्य असेल तर बैलहोंगलला जिल्हा केंद्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंबंधी बुधवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. याबरोबरच बैलहोंगल येथील सर्वपक्षीय नेते व मठाधीशांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. बैलहोंगलला ऐतिहासिक वारसा आहे. इंग्रजांविरुद्ध राणी कित्तूर चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा आदी थोर स्वातंत्र्ययोद्ध्यांनी लढा दिला. आमटूर बाळाप्पांचे जन्मठिकाण, बेळवडी मल्लम्मांचे कार्यक्षेत्रही याच तालुक्यात आहे. सध्या उपविभागीय कार्यालये बैलहोंगल येथे आहेत. सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक दृष्टीने जिल्ह्याचे ठिकाण बनवण्याची सर्व पात्रता या शहराला आहे.
जिल्ह्याचे विभाजन करू नये, विभाजन केल्यास कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हा विषयच मुळात सूक्ष्म आहे. नव्या जिल्ह्यांची निर्मिती करणारच असाल तर प्राधान्य क्रमाने बैलहोंगलचा विचार करावा. या परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरिकांचे विचार जाणून घेऊन निर्णय घ्यावा. नहून आंदोलन भडकण्याची शक्यताच अधिक आहे. शांतता भंग होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बैलहोंगल जिल्ह्याची घोषणा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. बैलहोंगल येथील सर्वपक्षीय नेते, प्रमुख मठाधीशांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बैलहोंगल जिल्ह्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
जिल्हा विभाजनासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेणार
जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेऊन जिल्हा विभाजनासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. बैलहोंगल येथील नागरिकांनीही जिल्ह्याची मागणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आमदारांची बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. याच अधिवेशनाच्या काळात ही बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.