बैलहोंगल नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : बेंगळूर विभागाशी संबंधित अनेक प्रस्तावांना मंजुरी : बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शाळा संकुल बांधणार
बेंगळूर : राज्य सरकारने बैलहोंगलला नगरपालिकेचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. बैलहोंगलमध्ये सध्या नगरपंचायत असून शहराचा विस्तार आणि लोकसंख्या विचारात घेत सरकारने नगरपालिकेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रत्येक प्रादेशिक विभागांना केंद्रस्थानी ठेवून विविध भागांत मंत्रिमंडळ बैठक घेण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार बुधवारी बेंगळूर विभागाची बैठक चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील नंदी टेकडीवर घेण्यात आली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील शासकीय कार्यालयांमधील सुविधा वाढविल्या जाणार आहेत. तसेच शहरातील विकासालाही अधिक प्राधान्य दिले जाईल. हुबळीतील कर्नाटक वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्था तसेच चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील नंदी वैद्यकीय महाविद्यालय-संशोधन संस्थेसाठी प्रत्येकी 10.70 कोटी रु. खर्चुन टेस्ला एमआरआय मशीन पुरविण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
बेंगळूर ग्रामीण आता बेंगळूर उत्तर जिल्हा
सरकारने बेंगळूर ग्रामीण जिल्ह्याचे नाव बदलून ‘बेंगळूर उत्तर जिल्हा’ असे फेरनामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी रामनगर जिल्ह्याचे ‘बेंगळूर दक्षिण जिल्हा’ असे फेरनामांतर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे बागेपल्ली तालुक्याचे नाव ‘भाग्यनगर’ असे ठेवण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
बैठकीत 48 मुद्द्यांवर चर्चा
मंत्रिमंडळ बैठकीत बेंगळूर विभागाशी संबंधित 3,400 कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बैठकीत एकूण 48 मुद्द्यांवर चर्चा झाली. बेंगळूर जिल्ह्यासाठी 2020 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याच्या एत्तीनहोळे योजनेसाठी सुधारित 23,251 कोटींच्या प्रस्तावाला संमती दर्शविण्यात आली. इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी असलेल्या कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी 1,125.11 कोटी रु. खर्चुन एकूण 31 शाळा संकुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बेकायदा खाण उद्योगासंबंधी आतापर्यंत झालेल्या तपासाची प्रगती, व्हावयाच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठी मंत्री एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. बेंगळूर दक्षिण जिल्ह्यातील हारोहळ्ळी औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रिक वाहनांचे सुटे भाग निर्मिती, जोडणी,चार्जिंग सुविधांसाठी 25 कोटी रु. खर्च करण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
बेंगळूर शहर विद्यापीठाला डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव
बेंगळूर शहर विद्यापीठाला डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव देण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. माजी पंतप्रधानांचे नाव देण्यात येत असलेले हे देशातील पहिले विद्यापीठ आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 7 मार्च 2025 रोजी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात देशासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ बेंगळूर शहर विद्यापीठाचे नाव बदलण्याची घोषणा केली होती.