माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना जामीन
आज कारागृहातून मुक्तता : पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणात दिलासा
बेंगळूर : पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी मंत्री आणि निजदचे आमदार एच. डी. रेवण्णा यांना अखेर जामीन मिळाला आहे. सोमवारी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. 5 लाख रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र, पुरावे नष्ट करू नयेत, विदेशात किंवा अज्ञात ठिकाणी जाऊ नये, अशा अटींवर त्यांना जामीन देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी त्यांची परप्पन अग्रहार कारागृहातून मुक्तता केली जाईल. हासनचे आमदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याशी संबंधित कथित अश्लील चित्रफीत प्रकरण उजेडात आल्यानंतर एका महिलेच्या मुलाने म्हैसूरच्या के. आर. नगर पोलीस स्थानकात आईचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली होती. या प्रकरणात पोलिसांनी माजी मंत्री एच. डी. रेवण्णा आणि त्यांचा निकटवर्तीय सतीश बाबू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आधी सतीश त्यानंतर एच. डी. रेवण्णा यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे रेवण्णांनी लोकप्रतिनिधींच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. गेल्या काही दिवसांपासून युक्तिवाद-प्रतिवाद झाले होते. न्यायाधीश संतोष गजानन भट यांच्यासमोर सोमवारी दीर्घवेळ सुनावणी झाली. रेवण्णांच्या वतीने ज्येष्ठ वकील सी. व्ही. नागेश यांनी युक्तिवाद केला. महिलेच्या अपहरण प्रकरणात रेवण्णा यांचा सहभाग नाही. आयपीसी सेक्शन 364 अ आणि 365 अंतर्गत त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल करणे कायद्याविरुद्ध आहे. अपहरण प्रकरणात ओलीस ठेवलेल्या महिलेने सुटकेची मागणी केलेली असावी, तिला जीवे मारण्याची धमकी असावी, हल्ला झालेला असावा, या सर्व आरोपांवर ठोस पुरावे, असावेत. अपहरण झालेल्या व्यक्तीला ओलीस ठेवणे हा गुन्हा आहे. पण, एच. डी. रेवणा यांनी महिलेचे अपहरण केलेले नाही, तिला ओलीस ठेवलेले नाही, असा युक्तिवाद वकील नागेश यांनी केला.
तक्रार करणाऱ्या महिलेच्या मुलाने आपल्या आईचे अपहरण झाल्याची समजूत करून घेतली आहे. शिवाय तक्रार देण्यास खूप विलंब झाला आहे. तक्रार देण्याआधी आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. पेनड्राईव्ह उघड झाल्यानंतर तक्रार देण्यात आली आहे. महिलेने रेवण्णा यांच्या घरात 10 वर्षे काम केले आहे. प्रकरणातील दुसरा आरोपी सतीश बाबू याने महिलेला दुचाकीवरून नेले होते. मतदानाच्या दिवशी पुन्हा आणून सोडले होते. त्या महिलेने मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे त्या महिलेचे अपहरण झाले, असे गृहीत धरणे कसे शक्य आहे, असा प्रश्न रेवण्णांचे वकील नागेश यांनी केला. जन्मठेपेच्या शिक्षेची शक्यता असेल तरच जामीन नाकारता येईल. मात्र, या प्रकरणात रेवण्णा यांच्यावर गुन्हा नोंदविण्यास ठोस पुरावे देखील नाहीत. सदर महिला आढळून येऊन सहा दिवस झाल्यानंतर देखील तिचे म्हणणे दाखल करून घेतलेले नाही. साक्ष जमविण्यासही विलंब झाला आहे. त्यामुळे महिला स्वेच्छेने गेल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पोलिसांनी रेवण्णांवर आयपीसी सेक्शन 364 अ आणि 365 अंतर्गत नोंदविलेले गुन्हे कायद्याविरुद्ध आहेत, असा युक्तिवादही नागेश यांनी केला. सरकारच्या वतीने विशेष अधिवक्ता जयना कोठारी यांनी प्रतिवाद केला. महिलेच्या अपहरणामागे पुरावे नष्ट करण्याचा हेतू आहे. हासनमध्ये सापडलेल्या पेनड्राईव्ह प्रकरणातील महिलेचे अपहरण झाले आहे. त्यामुळे तिला लपवून पुरावे नष्ट करण्याचा हेतू होता, असे जयना कोठारी यांनी म्हटले. एसआयटीच्यावतीने अतिरिक्त विशेष वकील अशोक नायक यांनी, रेवण्णा प्रभावी नेते असून त्यांची जामिनावर मुक्तता केल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत चौकशीसाठी त्यांनी एसआयटीला सहकार्य केलेले नाही, असा प्रतिवाद केला. युक्तिवाद-प्रतिवाद झाल्यानंतर सायंकाळी न्यायालयाने रेवण्णांना जामीन मंजूर केला.
तीन आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणात आरोप असणाऱ्या मधू, मनू आणि सुजय या तिघांना सोमवारी बेंगळूरच्या 42 व्या एसीएमएम न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर आणखी एक प्रमुख आरोपी सतीश बाबू याला चार दिवसांसाठी एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले.
माझे अपहरण झालेच नाही!
म्हैसूरच्या के. आर. नगर पोलीस स्थानकात दाखल झालेल्या अपहरण प्रकरणातील महिलेने व्हिडिओ जारी केला असून त्यात आपले अपहरण झाले नाही, असा दावा केला. अश्लील व्हिडिओचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मला माहिती न देता मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शहरात पसरलेल्या अफवांमुळे मनावर आघात झाला होता. त्यामुळे मी नातेवाईकांच्या घरी चार दिवस घालविण्याचा निर्णय घेतला. मात्र, टीव्ही पाहिल्यानंतर परिस्थिती लक्षात आली आणि हा व्हिडिओ बनवून स्पष्टीकरण देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्या महिलेने म्हटले आहे.