‘जामीन नियम अन् तुरुंग अपवाद’ सर्व गुन्ह्यांवर लागू
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : युएपीए सारख्या विशेष कायद्यांवरही प्रभावी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने कठोर दहशतवादविरोधी कायद्याच्या अंतर्गत आरोपी असलेल्या एका व्यक्तीला जामीन देत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. कायदेशीर सिद्धांत ‘जामीन नियम आहे, तुरुंग अपवाद आहे’ असून ते सर्व गुन्ह्यांकरता लागू होते. हा नियम युएपीए यासाख्या विशेष कायद्यांच्या अंतर्गत नोंद गुन्ह्यांकरताही लागू असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले आहे.
न्यायालयांनी उचित प्रकरणांमध्ये जामिनास नकार देण्यास सुरुवात केली तर हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन ठरेल अशी टिप्पणी न्यायाधीश अभय ओक आणि ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने केली आहे. सरकारी पक्षाकडून करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर असू शकतात, परंतु कायद्यानुसार जामिनाच्या प्रकरणावर विचार करणे न्यायालयाचे कर्तव्य आहे. जामीन हा नियम अन् तुरुंग अपवाद असल्याचे तत्व विशेष कायद्यांवरही लागू होत असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
खंडपीठाने हा निर्णय जलालुद्दीन खान नावाच्या आरोपीला जामीन मंजूर करताना दिला आहे. खानवर युएपीए अंतर्गत गुन्हे नोंद आहेत. जलालुद्दीने स्वत:च्या घरात प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सदस्यांना आसरा दिला होता.