अभिनेता दर्शनसमवेत सर्व आरोपींचा जामीन रद्द
सर्वोच्च न्यायालयाचा दणका : रेणुकास्वामी हत्या प्रकरणी सुनावणी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी हत्याप्रकरणी अभिनेता दर्शन आणि अन्य आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाकडून मंजूर झालेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. कुठलाही व्यक्ती कितीही लोकप्रिय असली तरीही कायद्याच्या नजरेत सर्व समान आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशात अनेक त्रुटी आहेत असे म्हणत न्यायाधीश जे. बी. पारदीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने दर्शन तसेच अन्य आरोपींना त्वरित ताब्यात घेत लवकर सुनावणी करण्याचा निर्देश दिला आहे.
आम्ही प्रत्येक पैलूवर विचार केला, उच्च न्यायालयाच्या आदेशात गंभीर त्रुटी आहेत आणि हा एका यांत्रिक पद्धतीला दर्शवित असल्याची टिप्पणी खंडपीठाने केली आहे. दरम्यान, कामाक्षीपाळ्या आणि बसवेश्वर नगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अभिनेता दर्शनला होसकेरे जवळील अपार्टमेंटमधून अटक केली आहे.
कुठल्याही सत्रावर न्याय प्रदान करणाऱ्या संस्थेने कुठल्याही स्थितीत कायद्याचे पालन करावे असा संदेश हा निर्णय देतो. कुठलाही क्यक्ती कायद्यापेक्षा वरचढ नाही, असे न्यायाधीश पारदीवाला यांनी म्हटले आहे. ठोस पुरावे आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारावर जामीन रद्द करण्याच्या आधाराची पुष्टी होते असे खंडपीठाने म्हटले आहे. दर्शन आणि सह-आरोपींना जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या 13 डिसेंबर 2024 च्या आदेशाच्या विरोधात कर्नाटक सरकारकडून दाखल याचिकेवर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
विशेष सुविधा दिल्यास....
तसेच सर्वोच न्यायालयाने राज्य सरकारला तुरुंगात आरोपींना विशेष सुविधा देण्याच्या विरोधात सतर्क केले आहे. आरोपींना विशेष सुविधा देण्यात आल्याचे कळल्यास पहिले पाऊल अधीक्षक आणि अन्य सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे असेल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
अभिनेत्री पवित्रा गौडा ताब्यात
रेणुकास्वामी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी कन्नड अभिनेत्री पवित्रा गौडाला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द करण्यात आल्यावर पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले आहे. हत्येच्या सर्व आरोपींचा जामीन रद्द झाल्यावर पोलिसांचे एक पथक पवित्राच्या घरी पोहोचले आणि तिला ताब्यात घेतले.
रेणुकास्वामीच्या पित्याकडून निर्णयाचे स्वागत
अभिनेता दर्शनला मंजूर करण्यात आलेला जामीन रद्द झाल्याचे कळताच रेणुकास्वामीच्या परिवाराने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयामुळे आमचा विश्वास मजबूत झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकार, न्यायपालिका आणि पोलिसांवरील आमचा विश्वास वाढला असल्याचे उद्गार रेणुकास्वामीचे पिता शिवनगौडा यांनी काढले आहेत.
दर्शनला अटक
बेंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांनी दर्शनला बेंगळूरच्या होसकेरे येथील अपार्टमेंटमधून अटक केली. कामाक्षीपाळ्या आणि बसवेश्वरनगर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. होसकेरेहळ्ळी येथे पत्नी विजयलक्ष्मी वास्तव्यास असलेल्या अपार्टमेंटमध्ये दर्शनला अटक करण्यात आली. या प्रकरणातील पहिली आरोपी पवित्रा गौडासह इतर आरोपी प्रदूष, लक्ष्मण, नागराज यांनाही अटक करण्यात आली आहे.