अमित डेगवेकरसह तीन आरोपींच्या जामीन
याचिकेवरील निकाल राखून, गौरी लंकेश हत्या प्रकरण : उच्च न्यायालयाकडून सुनावणी पूर्ण
प्रतिनिधी/ बेंगळूर
पुरोगामी विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अमित डेगवेकर याच्यासह इतर आरोपींनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी अमित डेगवेकर, सातवा आरोपी सुरेश एच. एल. आणि 17 वा आरोपी के. टी. नवीनकुमार यांनी दाखल केलेल्या स्वतंत्र जामीन याचिकांवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. विश्वजित शेट्टी यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने दीर्घ सुनावणी करून निकाल राखून ठेवला आहे.
हत्या प्रकरणातील 11 वा आरोपी मोहन नायक याला उच्च न्यायालयाने काही आठवड्यांपूर्वी जामीन मंजूर केला होता. ही बाब हेरून आपल्यालाही जामीन द्यावा, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यावर सरकारी वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला होता. मोहन नायक याला यापूर्वी उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने जामीन नाकारला होता. खून, फितुरी यासारखे गंभीर आरोप असताना आरोपींना जामीन देता येत नाही, असे सरकारी पक्षाच्या वकिलांनी म्हटले होते.
गौरी लंकेश हत्या प्रकरणात जामीन मिळविलेला एकमेव आरोपी मोहन नायक असून त्यांच्या जामिनाविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी बाकी आहे.अमित डेगवेकरची बाजू मांडणारे वकील बसवराज सप्पन्नावर यांनी युक्तिवाद करताना पहिला आरोपी अमोल काळे याने दिलेल्या जबानीच्या आधारे अमितला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात अमितवर फक्त आर्थिक मदतीचा आरोप आहे. त्याचा हत्या प्रकरणात थेट सहभाग नव्हता. अमितकडून आधारकार्ड, ओळखपत्रे, बस तिकीट जप्त करण्यात आले होते. याव्यतिरिक्त काहीही झालेले नाही. 21 मे 2018 पासून अमित कारागृहात आहे. 11 वा आरोपी मोहन नायकप्रमाणे अमितला देखील जामीन मंजूर करावा, अशी विनंती केली होती.