For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विभवकुमारचा जामीन अर्ज फेटाळला

06:14 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
विभवकुमारचा जामीन अर्ज फेटाळला
Advertisement

स्वाती मालीवालसह दिल्ली पोलिसांचाही जामिनाला विरोध : तीस हजारी न्यायालयात सुनावणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यांनी 25 मे रोजी न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. या अर्जावरील सुनावणीवेळी स्वाती मालीवालही न्यायालयात हजर होत्या. त्यांनी न्यायालयात विभवकुमारच्या जामिनाला तीव्र विरोध दर्शवला.

Advertisement

विभवचे वकील हरिहरन यांनी सुनावणीदरम्यान जामीन मिळवण्याच्या उद्देशाने जोरदार युक्तिवाद केला. स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात जबरदस्तीने प्रवेश केला होता. त्यांच्या शरीराच्या संवेदनशील भागांवर जखमांच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसताना निर्दोष हत्येचा प्रयत्न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच स्वाती मालिवाल यांना निर्वस्त्र करण्याचाही विभवचाही हेतू नव्हता. या जखमा स्वत: हून झालेल्या असू शकतात, असे न्यायालयासमोर सांगितले. मात्र, हा युक्तिवाद ऐकून स्वाती मालीवाल कोर्टरूममध्येच रडू लागल्या. विभव हा सामान्य माणूस नाही, तो मंत्र्यांना मिळणाऱ्या सुविधा वापरतो. त्याला जामीन मिळाला तर माझ्या जीवाला धोका निर्माण होईल, मला तो मारून टाकेल, असे त्यांनी सांगितले. तसेच दिल्ली पोलिसांनीही विभवची मुक्तता करण्यास विरोध दर्शवला. दिल्ली पोलिसांच्या वकिलाने युक्तिवाद करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. महिलेला अशाप्रकारे मारहाण करण्यात आली की तिच्या कपड्यांचे बटणदेखील तुटल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सर्व बाजू जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने सुरुवातीला निकाल सुरक्षित ठेवत सायंकाळी जामीन अर्ज फेटाळत असल्याची घोषणा केली.

स्वाती मालीवाल यांना अश्रूधारा

सुनावणीदरम्यान स्वाती मालीवाल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडतानाचा व्हिडिओ न्यायालयाच्या खोलीत न्यायाधीशांना दाखवण्यात आला. दरम्यान, विभवचे वकील न्यायाधीशांना दिल्ली पोलिसांच्या एफआयआरबद्दल सांगत असताना स्वाती मालीवाल कोर्टरूममध्ये रडू लागल्या. सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आल्याचे वकिलाने सांगितले. यामध्ये कोणतीही छेडछाड करण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावाही विभवच्या वकिलांनी केला.

Advertisement
Tags :

.