Solapur Crime : बाहुबली, दानम्मा देवी मंदिरातील चोरी सात तासात उघडकीस !
सोलापुरात देवमंदिर चोरीप्रकरणी तिघा गुन्हेगारांना अटक; लाखोचा ऐवज जप्त
सोलापूर : विजापूर रस्त्यावरील जैन समाजाच्या असलेल्या बाहुबली मंदिर तसेच दानम्मा देवी मंदिर या ठिकाणी झालेल्या चोरीचा तपास शहर गुन्हे शाखेचा पोलिसांनी अवघ्या सात तासात उघडकीस आणला आहे. यात सराईत तीन गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरलेल्या मूर्ती तसेच दानपेटीतील रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
आकाश सुरेश पवार (वय २६ रा. नेहरूनगर विजापूर रोड सोलापूर). अशपाक मौला शेख (वय-२७ रा. थोरली ईरण्णा वस्ती, झोपडपट्टी नंबर २ विजापूर रोड सोलापूर), करण उर्फ करण्या केंगार (वय-३४ रा. दमाणी नगर, सोलापूर) असे चोरी करणाऱ्या तीन गुन्हेगारांची नावे आहेत. ४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वा. ते ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान विजापूर रोडवरील बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरामध्ये चोरी झाली.
येथील विविध देवतांच्या पंचधातूंच्या मूर्ती तसेच रोख रक्कम असा १ लाख ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला होता. याबाबत अनिल हिराचंद माणिकरोटे (रा. चक्रवर्ती हाऊसिंग सोसायटी भवानी पेठ सोलापूर) यांनी याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच याच दरम्यान विजापूर रोड येथील रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोर असलेल्या दानम्मा देवीच्या मंदिरातील दानपेटीतील ६ हजार रुपये रोख अज्ञात चोरट्यांनी चोरले होते.
याबाबत सिद्धया रुद्रया हिरेमठ (रा. गणेश मंदिर विजापूर रोड) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती घेतली. सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याची माहिती मिळाली. आरोपीचा शोध घेत असताना रविवारी रात्री पोलीस अंमलदार इम्रान जमादार व राजकुमार पवार यांना गोपनीय माहिती मिळाली.
यातील गुन्हेगार हे देवतांच्या मूर्ती विक्री करण्यासाठी मोदी रेल्वे बोगदा येथे येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून यातील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली केली.
आरोपीकडून पद्मावती देवीच्या पंचधातूच्या दोन मूर्ती, बाहुबली देवाची पंचधातूची एक मूर्ती, आदिनाथ देवाची पंचधातूची एक मूर्ती, जैन धर्मातील २४ तीर्थकर यची एक मूर्ती, पार्श्वनाथ देवाची एक मूर्ती, अनंतनाथ देवाची एक मूर्ती. शांतिनाथ देवाची एक मूर्ती अशा देवतांच्या एकूण ८ मौल्यवान मूर्ती व रोख रक्कम २ हजार असा एकूण १ लाख ६५ हजार किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सपोनि शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे, आदींनी केली.