बागणीच्या अविनाश सुर्वे यांनी सर केले आफ्रिकेतील माउंट किलिमंजारो
बागणी वार्ताहर
येथील अविनाश सुर्वे यांनी आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर माउंट किलिमंजारोची यशस्वीपणे चढाई केली आहे. त्यानंतर त्यांनी तिरंग्यासह आपला फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. माउंट किलिमंजारो समुद्र सपाटीपासून ५८९५ मिटर उंच आहे. एवढी उंची सर करणारी बागणी व परिसरातील ते पहिलेच व्यक्ती होय.
त्यांनी माउंट किलिमंजारोची चढाई १० ऑगस्टला सुरवात केली ते १७ रोजी सायंकाळी ते खाली आले. यापूर्वी त्यांनी मार्च मध्ये त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पची ५३६५ मिटर उंच यशस्वी चढाई केली होती. अविनाश सुर्वे यांना लहानपणा पासून ट्रॅकिंगची आवड आहे. कॉलेज जीवनामध्ये त्यांनी विविध ठिकाणी ट्रॅकिंगला जाउन अनेक डोंगरावरती त्यांनी यशस्वी चढाई केली आहे. आता ते दुबई येथे जीइएमएस मॉर्डन ॲकेडमीमध्ये पर्यवेक्षक आणि ICSE मध्ये इंग्रजी भाषा, इंग्रजी साहित्य आणि थिएटर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिप्लोमा अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्यांना दुबईतील सर्वात मनाचा उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार ही त्यांना प्राप्त झाला आहे.
अविनाश हे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटीस नावाच्या सांधिवात आजाराने ग्रस्त आहेत तरीही प्रचंड मानसिक आणि शारीरिक जिद्दीने ट्रॅकिंगची आवड ते नेहमी पूर्ण करत असतात. त्यांच्या प्रेरणेने अनेक युवक सध्या काम करत असून ते देखील ट्रेकिंग साठी पुढे येत आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. बागणी येथील नागरिकांनी देखील या गोष्टीचा आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.