राष्ट्रीय मानांकनासाठी 37 आरोग्य केंद्रांची निवड
कोल्हापूर :
जिल्ह्यातील 14 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 23 आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांची राष्ट्रीय मानांकनासाठी निवड झाली. या अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती व निवड झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राकडील वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने होते.
‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक’ हा भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी विकसित केलेला मानक आहे. कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे मूल्यांकन चार टप्यात करण्यात येते. पहिल्या टप्यात आरोग्य संस्थांमार्फत स्वमूल्यांकन करणे, दुसऱ्या टप्यात जिल्हा गुणवत्ता आश्वासन पथकमार्फत भेट देऊन मूल्यांकन, तिसऱ्या टप्यात राज्यस्तरीय समितीमार्फत मूल्यांकन व चौथ्या टप्यात राष्ट्रीय मूल्याकंन करण्यात येते. शासनमार्फत उत्कृष्ट मूल्यांकन प्रमाणपत्र प्राप्त आरोग्य संस्थांना त्यांच्या खाटांच्या प्रमाणात रोख स्वरुपात बक्षीस देण्यात येते. उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयास 5 लाख, प्राथमिक आरोग्य केंद्रांना 3 लाख व आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना तीन वर्षात 1 लाख 26 हजार याप्रमाणे बक्षीसांची रक्कम असते.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जि. प. सीईओ कार्तिकेयन एस. यांनी राष्ट्रीय मानांकनासाठी आरोग्य संस्थाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांना गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा, संसर्ग नियंत्रण, स्वच्छता आणि सुविधा, रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण, कर्मचारी व्यवस्थापन व गुणवत्ता व्यवस्थापन करावे असे सांगितले. तसेच जिल्हास्तरीय मूल्यांकनामध्ये पात्र संस्थांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय मानांकनासाठी शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर मंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने म्हणाले, जिल्ह्यातील जास्तीत जास्त आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता अभिवचन मानांकन योजनेमध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय मानांकन मिळवावे. सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच मूल्यांकनासाठी आवश्यक माहिती अद्यावत करावी. गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावी अमंलबजावणी करावी. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी मार्गदर्शक सूचनानुसार या कार्यक्रमाची प्रभावी अमंलबजावणी करून उर्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्रांनी सन 2025-26 या वर्षामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून राष्ट्रीय मानांकनासाठी प्रयत्न करून जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा आदर्श निर्माण करावा, असे नमूद केले.
कार्यशाळेमध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कुरुंवाडे, गुणवत्ता व्यवस्थापक डॉ. सना आमरीन (पुणे), राष्ट्रीय तंबाखुमुक्त कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. मुजाहिद आलासकर (सांगली), जिल्हा गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रियांका साबळे यांनी प्रशिक्षक म्हणून कामकाज पाहिले.