बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
चीनच्या वर्ल्ड नं 2 वांग झी ला दिला पराभवाचा धक्का : मिश्र दुहेरीत ध्रुव-तनिशाचीही आगेकूच
वृत्तसंस्था/पॅरिस
दोनवेळ ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधूने बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपला विजयी धडाका कायम ठेवताना उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात सिंधूने चीनच्या वर्ल्ड नं 2 वांग झीला 21-19, 21-15 असे पराभवाचा दणका दिला. विशेष म्हणजे, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने वांगला आतापर्यंत आठवेळा पराभूत केले आहे. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या सिंधूने अवघ्या 48 मिनिटांत वांग झीला नमवत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. प्रारंभी, पहिल्या गेममध्ये सिंधूने 6-1 अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी तिने कायम ठेवत हा गेम 21-19 असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्येही सिंधूने आपले वर्चस्व कायम ठेवले. नेटजवळ तिने सरस खेळाचे प्रदर्शन करताना वांग झीला चुका करण्यास भाग पाडले. याचा फायदा घेत सिंधूने 13-6 आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम ठेवत तिने हा गेम 21-15 असा जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. आता, तिची लढत इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वर्दानीशी होईल. दरम्यान, इंडोनेशियन पुत्री व सिंधू आतापर्यंत दोनवेळा आमनेसामने आल्या आहेत. या दोनही लढतीत पुत्रीने बाजी मारली आहे. यामुळे आज होणाऱ्या लढतीत सिंधू विजय मिळवत आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
ध्रुव-तनिशाचीही आगेकूच
दुसरीकडे, मिश्र दुहेरीत भारताच्या 16 व्या मानांकित ध्रुव व तनिषा जोडीने हाँगकाँगच्या टँग चुन मान-त्से यिंग या जोडीला 21-19, 12-21, 15-21 असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारतीय जोडीने पहिला गेम गमावल्यानंतर शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना दुसरा व तिसरा गेम जिंकत आपली आगेकूच कायम ठेवली आहे. आता, त्यांची पुढील लढत मलेशियाच्या चेन टँग व तो ई वेई या जोडीशी होईल.