बॅडमिंटन : भारताचे चौघेजण उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ सारब्रुकेन, जर्मनी
मालविका बनसोड, आयुष शेट्टी, सतीश कुमार करुणाकरन व रक्षिता श्री या चार भारतीय बॅडमिंटनपटूंनी हायलो ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
मालविकाने बिगरमानांकित इरिना अमेली अँडरसेनचा 21-13, 21-16 असा पराभव करून शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. सलग दुसऱ्यांदा तिने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. गेल्या फेब्रुवारीत बनसोडने अझरबैजान आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती तर यूएस ओपनमध्ये तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. तिने 8-1 अशी झटपट आघाडी घेतली. हा जोम कायम ठेवत तिने पहिला गेम सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र ती 4-8 अशी पिछाडीवर पडली होती. पण नंतर तिने मुसंडी मारत हा गेमही जिंकून 41 मिनिटांत सामना संपवला. तिची पुढील लढत जागतिक 31 वी मानांकित व येथील चौथी मानांकित एन्ग्युयेन थुई लिन्ह (व्हिएतनाम) हिच्याशी होईल.
भारताच्या 17 वर्षीय रक्षिताने धक्कादायक निकाल लावताना दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या व येथे दुसरे मानांकन मिळालेल्या स्कॉटलंडच्या किर्स्टी गिल्मूरचे आव्हान 21-14, 21-12 असे संपुष्टात आणले. उपांत्यपूर्व फेरीत तिची लढत डेन्मार्कच्या आठव्या मानांकित दावल जेकबसेनशी होईल.
पुरुष एकेरीत 19 वर्षीय आयुष शेट्टीने इटलीच्या जिओवानी टोटीवर 21-13, 21-9 अशी एकतर्फी मात केली. त्याची उपांत्यपूर्व लढत फिनलँडच्या कॅले कोलोनेनशी होईल. सातवे मानांकन मिळालेल्या सतीश कुमार करुणाकरनची फ्रान्सच्या ख्रिस्तो पोपोव्हशी होईल. मात्र सतीश कुमारला मिश्र दुहेरीत आद्या वरियातसमवेत खेळताना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना फ्रान्सच्या टॉम लॅलट ट्रेस्कार्टे व एल्सा जेकब यांनी 21-19, 21-13 असे हरविले.