बॅडमिंटन आशिया : शायना, दीक्षाला सुवर्ण
वृत्तसंस्था/ चेंगडू
शायना मनिमुथू आणि दीक्षा सुधाकर यांनी त्यांच्या संबंधित श्रेणींमध्ये रविवारी येथे सुवर्णपदके जिंकली आणि बॅडमिंटन आशिया 17 वर्षांखालील तसेच 15 वर्षांखालील स्पर्धांमध्ये भारताने आपले सर्वोत्तम प्रदर्शन नोंदवले.
15 वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात शायनाने जपानच्या चिहारू तोमिता हिचा 21-14, 22-20 असा पराभव केला, तर दीक्षाने देशाच्या लक्ष्य राजेशचा 21-16, 21-9 असा पराभव करत 17 वर्षांखालील मुलींच्या एकेरीचा किताब पटकावला. रविवारी झालेल्या विजयांसह भारतीय पथकाने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह या स्पर्धेचा समारोप केला. या अजिंक्यपद स्पर्धेतील त्यांची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने शेवटची दोन सुवर्णपदके 2013 मध्ये जिंकली होती. तेव्हा सिरिल वर्माने 15 वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे विजेतेपद जिंकले होते आणि चिराग शेट्टी आणि एम. आर. अर्जुन यांनी 17 वर्षांखालील मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.
रविवारी शायना 15 वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद जिंकणारी चौथी भारतीय महिला खेळाडू ठरली, तर 27 मिनिटांच्या फायनलमध्ये वर्चस्व गाजविलेली दीक्षा 17 वर्षांखालील मुलींचे एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला एकेरी खेळाडू बनली. शनिवारी जगशेर सिंह खंगगुरा तसेच जंगजित सिंग काजला आणि जननिका रमेश या मिश्र दुहेरीच्या जोडीने कांस्यपदके जिंकली होती.