फोर्ट रोड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
बेळगाव : शहराचा महत्त्वाचा भाग असलेल्या फोर्ट रोड परिसरात रस्त्याची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. रस्त्यामध्ये खड्डेच अधिक प्रमाणात असल्याने वाहतूक करणे अवघड झाले आहे. धारवाड रोडमार्गे रविवार पेठ परिसरात ये-जा करणारे ट्रक तसेच लहान वाहने यामार्गे प्रवास करत असतात. परंतु, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहे. धारवाड रोडवरील जिजामाता चौकापासून कर्नाटक चौकापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसात वारंवार पाणी साचत असल्यामुळे रस्ता खराब झाला आहे. फोर्ट रोड परिसरात अनेक दुचाकी, चारचाकी व ट्रक दुरुस्ती व पार्ट्स दुकान आहेत. त्यामुळे बेळगावसह आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात ग्राहक या ठिकाणी येतात. त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सदर रस्त्यामुळे व्यापारालाही फटका बसत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. फोर्ट रोड परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, तो वेळच्यावेळी उचलला जात नसल्यामुळे गटारी भरून पाणी रस्त्यावर थांबत आहे. यामुळे रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता दुरुस्तीची अनेकवेळा मागणी करूनदेखील दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.