सर्वच उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरवस्था
सततच्या पावसामुळे रस्ते खराब : तातडीने डागडुजी करण्याची प्रवाशांची मागणी
बेळगाव : रेल्वे ओव्हरब्रिजवरील समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या पाठोपाठ आता गोगटे ओव्हरब्रिज येथेही रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील पंधरा दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. त्यातच रात्रीच्यावेळी पथदीप बंद असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलावरील रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरातील उड्डाणपुलांवरील रस्ते खराब झाले आहेत. गोगटे सर्कल, तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल व कपिलेश्वर उड्डाणपुलावरही रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता उकरून खडी इतरत्र पसरली आहे. असे असताना रेल्वे प्रशासन, तसेच महानगरपालिकाही उड्डाणपुलांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. त्यामुळे उड्डाणपुलांवरील समस्या वाढत आहेत. गोगटे उड्डाणपुलावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात असतानाही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मराठा मंदिर कॉर्नर परिसरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात पेव्हर्स बसविण्यात आले होते. परंतु, हे पेव्हर्सही बाहेर पडले आहेत. त्याचबरोबर इतर ठिकाणी खड्डे पडले असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. उड्डाणपुलावरील पथदीप बऱ्याचवेळा बंद असल्याने खड्डे दिसून येत नाहीत. त्यामुळे डागडुजी करण्यासोबतच पथदीप सुरू करण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.