सुळगा (हिं.) केंबाळी नाला ते महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा
जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ : रस्त्यासाठी निधी मंजूर होऊनही रस्ता दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष : प्रवासी वर्गातून संताप
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरील सुळगा (हिं.) केंबाळी नाला ते कर्नाटक-महाराष्ट्र (बाची) हद्दीपर्यंतच्या जवळपास सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूच्या सापळ्यात अडकणे असे प्रवासीवर्गांचे झाले आहे. सदर रस्त्याची दुरुस्ती आणि नवीन रस्त्याची बांधणी करण्यासाठी नऊ कोटी रुपये मंजूर झाल्याचे शासनाकडून सांगण्यात आले. मात्र अद्याप या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. हिंडलगा-सुळगा एवढ्याच पट्ट्यामध्ये कामाला सुरुवात करण्यात आली. तेही काम सध्या अर्धवट असल्याने या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ प्रवासीवर्गावर आली आहे. यामुळे प्रवासीवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव-बाची मार्गावरील सुळगा(हिं.) केंबाळी नाल्याजवळ, उचगाव गणेश दूध संकलन केंद्राच्या समोर(बेळगुंदी फाटा) तर उचगाव फाट्यानजीक, तुरमुरी गावाजवळ आणि बाची पट्ट्यातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि खड्ड्यांतून साचणारे पाणी यामुळे या खड्ड्यांचा आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यात अडकून वाहनांचे मोठे नुकसान होत असून अपघातांची तर सध्या मालिका सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून मोठमोठे खड्डे आणि त्यात भरलेले पाणी यामुळे प्रवास करताना प्रवासीवर्गाला जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित सदर खड्डे बुजवावेत. अन्यथा रास्ता रोको करून याचा जाब संबंधितांना विचारला जाईल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
बेळगाव-वेंगुर्ले हा मार्ग तीन राज्यांना जोडणारा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा तीन राज्यांना जोडणारा हा दुवा आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक प्रवासी याचमार्गे बेळगावलाही येतात. मात्र या रस्त्याची बेळगाव ते बाची या 12 किलोमीटर अंतराच्या रस्त्यात अनेक ठिकाणी जवळपास सहा फूट लांबी रुंदीचे आणि एक ते दीड फूट खोलीचे असे मोठमोठे खड्डे सध्या या रस्त्यावर दिसून येत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून याच ठिकाणी या रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झालेली आहे. हे रस्ते म्हणजे मृत्यूचे सापळेच बनले आहेत. या खराब झालेल्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे तसेच लोकप्रतिनिधींचेही सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तरी तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या खड्ड्यांच्या दुतर्फा असलेला रस्ता चांगला असल्याने येणारी वाहने वेगवान येतात आणि या खड्ड्यात अडकतात. यामुळे या वाहनधारकांचे, वाहनांचे बरेच मोठे नुकसान होत असून याचा आर्थिक फटकाही त्यांना सहन करावा लागत आहे.
वाहनचालकाचे प्राण बालबाल बचावले
सोमवारी रात्री सुळगा केंबाळी नाल्याशेजारी असलेल्या खड्ड्यांमध्ये एका वाहनचालकाची गाडी खड्ड्यात गेल्याने टायर फुटुन थोडक्यात होणारा मोठा अपघात टळला आणि वाहनचालकाचे प्राण बालबाल बचावले. सदर घटना रात्रीच्या अंधारात वाहन चालवत असताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने घडला. या वाहनचालकाला जवळपास 12000 चा मोठा फटका बसला आहे.
जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना
बेळगाव-बाची मार्गातील काही ठिकाणी रस्त्यावर इतके खड्डे पडलेले आहेत की, ते समजूनही येत नाहीत. चारचाकी तसेच दुचाकी वाहने भरधाव जात असताना अकस्मात मध्ये खड्डे आल्याने वाहन चालवताना मोठा धोका पत्करावा लागतो. ब्रेकचा वापर करत असताना मोठा धोकाही वाहनांना तसेच वाहनचालकांनाही बसतो. दुचाकी वाहने या खड्ड्यात अडकून पडून अनेकांना दुखापती झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते जागरूक राहणे गरजेचे आहे.
-मिथील जाधव उचगाव.
लोकप्रतिनिधीनीं त्वरित लक्ष द्यावे
सध्या पावसाळा सुरू असल्याने या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांतून पाणी भरल्याने या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. आणि यामुळे आमची वाहने या खड्ड्यांत अडकून वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. हे खड्डे जीवावर बेतले आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून सदर खड्डे बुजवून घेण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- शेखर पाटील, सुळगा