बेळगाव-गोवा रस्त्याची दुरवस्था
डांबरीकरण उखडल्याने व्यवसायांसह व्यापाराला मोठा फटका
बेळगाव : बेळगाव बाजारपेठेत 30 ते 40 टक्के ग्राहक हे निव्वळ गोवा व कोकणातून येत असतात. गोव्याहून बेळगावला येण्यासाठी दोन मार्ग असून यापैकी बेळगाव-चोर्ला रस्त्याची अक्षरश: वाताहत झाली आहे. कणकुंबी भागामध्ये वर्षभरापूर्वी करण्यात आलेले डांबरीकरण उखडून गेले असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. याचा परिणाम बेळगावच्या उद्योग-व्यवसायावर होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. बेळगाव व गोव्याला जोडण्यासाठी चोर्ला व अनमोड असे दोन घाटमार्ग आहेत.
यापैकी अनमोड रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे तर कणकुंबी ते चोर्ला रस्त्याची धुळदाण झाली आहे. वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने 62 कोटी रुपये खर्च करून रस्ता केला होता. परंतु एका पावसातच या रस्त्यावरचे डांबरीकरण उखडून गेले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याचा परिणाम बेळगावच्या उद्योग व व्यवसायावर होत आहे. वर्षभरापूर्वी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सने रस्त्याच्या प्रश्नासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. सध्या दिवाळीमुळे मोठ्या प्रमाणात गोव्याचे ग्राहक खरेदीसाठी बेळगावला येत आहेत. परंतु रस्त्याच्या समस्येमुळे ते हैराण होत आहेत. त्यामुळे शेजारील हुबळी, धारवाड बाजारपेठेला पसंती देण्यात येत आहे. बेळगावच्या व्यवसायाला मोठा फटका बसण्यापूर्वी रस्ता करण्याची मागणी केली जात आहे.