कॅनडा अन् भारतादरम्यान बॅकडोअर चर्चा
खलिस्तान, निज्जर सर्व मुद्द्यांवर चर्चा : संबंध सुधारण्यावर भर
वृत्तसंस्था/ ओटावा
भारत आणि कॅनडाच्या मुत्सद्द्यांदरम्यान वादग्रस्त मुद्दे सोडविण्यासाठी बैठका होत आहेत. विशेषकरून कॅनडात खलिस्तान समर्थक घटकांच्या हालचाली आणि अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली आहे. भारतीय आणि कॅनडाच्या मुत्सद्द्यांनी अलिकडेच किमान दोनवेळा बैठका घेतल्या आहेत. यादरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी कॅनडासोबत स्वत:च्या चिंता मांडल्या आहेत. अलिकडच्या काळात कॅनडातील खलिस्तानी संघटनांची बाजू घेणाऱ्या पक्षाने जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे देखील कॅनडाच्या भूमिकेत बदल झाला असल्याचे मानले जात आहे.
दोन्ही देशांच्या मुत्सद्द्यांदरम्यान चालू वर्षाच्या प्रारंभीही बैठका झाल्या होता. चर्चेचा हा क्रम पुढे नेण्यासाठीच अलिकडच्या बैठका पार पडल्या आहेत. मागील वर्षी जून महिन्यात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या झालेल्या हत्याप्रकरणीही चर्चा करण्यात आली आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्याकरता हे प्रयत्न करण्यात आले आहेत.
तोडगा काढण्याचे काम
कॅनडाचे जागतिक प्रकरणांसाठीचे सहाय्यक उपमंत्री वेल्डन एप यांनी काही काळापूर्वी लाओसमध्ये भारतीय विदेश मंत्रालयातील माजी सचिव जयदीप मजूमदार यांची भेट घेतली होती. यानंतर दोन्ही अधिकारी नवी दिल्लीतही भेटले. यादरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांदरम्यान भारत-कॅनडा संबंध, कॅनडातील खलिस्तानी कारवाया आणि निज्जरच्या हत्येच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करत संबंध पुढे नेण्याचे मार्ग शोधण्यासाठी संवाद आवश्यक असल्याबद्दल दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे. भारताच्या चिंता कॅनडाने संवेदनशीलपणे जाणून घेतल्या असून संयुक्त समित्या स्थापन करण्यावर विचारविनिमय झाला आहे.
खलिस्तानी कारवायांमुळे चिंता
कॅनडातील भारतीय राजदूत संजय वर्मा समवेत वरिष्ठ भारतीय मुत्सद्द्यांना लक्ष्य करणारी पोस्टर्स अनेकवेळा झळकविण्यात आली आहेत. या नव्या प्रकारामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची वादग्रस्त पोस्टर्सही अलिकडच्या काळात कॅनडात दिसून आली आहेत. या प्रकरणी भारताने कॅनडासमोर नाराजी व्यक्त केली आहे. भारत आणि कॅनडा संबंधांमधील कटूतेचे मोठे कारण खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या आहे. निज्जरची मागील वर्षी 18 जून रोजी सरे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येविषयी वक्तव्य करत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी यामागे भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. भारताने हा आरोप फेटाळला होता, परंतु त्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता.