कडोलीच्या अयोध्यानगरातील मूलभूत समस्यांकडे पाठ
पाणीटंचाई, रस्ते, गटारी आदींनी नागरिक त्रस्त : नळ आहेत परंतू पाणीच नाही
वार्ताहर /कडोली
नागरी समस्यांनी त्रस्त असलेल्या येथील अयोध्यानगरवासियांना दुजाभावाची वागणूक मिळत असून कोणाच्या सांगण्यावरून अयोध्यानगरामधील समस्यांकडे पाठ फिरविली जात आहे, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे. पाणीटंचाई, रस्ते, गटारी आदी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. जवळपास 100 हून अधिक कुटुंबे आणि एक हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या अयोध्यानगरवासियांकडे गेल्या 10 वर्षापासून नागरी समस्यांकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या नगरात प्रामुख्याने दुर्लक्षित रस्त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावरून पायी ये-जा करणे देखील अवघड असते. तर वाहने कशी हाकायची, असा प्रश्न निर्माण होतो. अयोध्यानगरात इंडेन गॅस कंपनीचे गोडावून आहे. गॅस सिलिंडर नेण्यासाठी कडोली परिसरातील 10 ते 12 खेडेगावचे नागरिक वाहनाने ये-जा करीत असतात. या रस्त्यावरून वर्दळ जास्त असते. त्यासाठी या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्राम पंचायत आणि लोकप्रतिनिधींकडे केली जात आहे. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई
पिण्याच्या पाण्याबद्दल तर भीषण टंचाई जाणवत असते. गावच्या उत्तरेकडे असलेल्या भागात पाण्याचा सुकाळ आहे. रोज हजारो लिटर पाणी वाया जाते. परंतू दक्षिणेकडील भागातील अयोध्यानगरात पाणीटंचाईने दुष्काळ निर्माण झाला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडण्यात आले आहेत. परंतु या नळांना पाणीच येत नाही. हे नळ केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
गटारीही नाहीत
अयोध्यानगरात रस्त्यांबरोबर गटारीही नाहीत. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अयोध्यानगरातील सांडपाणी आणि पावसाचे पाणी जाण्यासाठी गटारींची अत्यंत गरज आहे. गटारीद्वारे सांडपाणी खारीला जोडण्यासाठी नियोजन करता येते. पण याकडेही दुर्लक्ष आहे. या सर्व समस्यांबद्दल वॉर्डातील सदस्यांना विचारले असता आमच्या वॉर्डाला विकास कामांसाठी निधी दिला जात नाही. त्यामुळे आम्ही विकास कसा करणार, असे सांगितले जाते. यापूर्वी या अयोध्यानगरातील ग्रा. पं. सदस्य ग्रा. पं. मध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करीत होते. म्हणूनच या भागाला निधी मंजूर केला नाही का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष-आंदोलनाचा इशारा
निवडणुकीच्या दरम्यान मते मागण्यासाठी आलेले नेतेमंडळी सत्ताधारी असो किंवा विरोधी गटातील असो सर्वच नेतेमंडळी अयोध्यानगरातील समस्या सोडविण्याचे आश्वासन देतात. पण निवडून आल्यानंतर मात्र समस्यांकडे साफ दुर्लक्ष करतात. अयोध्यानगरातील समस्या तशाच ठेवून गावचा विकास झालाय असे गृहीत कसे धरणार, असा प्रश्न येथील ग्रामस्थांतून केला जात आहे. रस्ते, गटारी आणि पाणी या समस्या प्रामुख्याने अयोध्यानगरात निर्माण झाल्या असून याकडे लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करीत आहेत? या समस्यांचे तात्काळ निवारण न झाल्यास येथील नागरिकांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा कार्यक्रम लवकर हाती घेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.