For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बच्चूदादा, भाजपसोबत सत्तेत जावेच लागेल !

03:55 PM May 27, 2025 IST | Radhika Patil
बच्चूदादा  भाजपसोबत सत्तेत जावेच लागेल
Advertisement

पाटण :

Advertisement

पाटण तालुक्यात गेल्या पंधरा वर्षात दबावाच्या राजकारणात आपल्या कार्यकर्त्यांची केवळ पिळवणूक झाली. कार्यकर्त्यांना वेठीस धरून प्रवेश करून घेतले. धरणांची कामे, वन्यप्राण्यांचा त्रास, रस्त्यांची दुरवस्था आदी विकासकामे रखडली आहेत. सर्वसामान्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय झाले नाहीत. हुकूमशाही प्रवृत्तीने कार्यकर्त्यांवर आजपर्यंत अन्यायच झाला. त्यामुळे तालुक्याच्या नवीन विकासाच्या संकल्पनांच्या मागे जावे लागणार आहे. त्यासाठी सत्यजितदादा आपल्याला भाजपासोबत सत्तेत जावेच लागेल, अशा भावना पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केल्या.

दरम्यान, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेवून सर्वांना विश्वासात घेत योग्य तो निर्णय लवकरच घेऊ, असा विश्वास सत्यजितसिंह पाटणकर यांनी कार्यकर्त्यांना बोलताना दिला.

Advertisement

पाटण येथील श्रीराम मंदिरात पाटण विधानसभा मतदारसंघातील राजकीय दिशा ठरविण्यासाठी आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मंथन बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या. यावेळी ढेबेवाडी विभागातील माजी जिल्हा परिषद सदस्य हिंदूराव पाटील, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, याज्ञसेन पाटणकर यांची उपस्थिती होती. मुसळधार पाऊस असताना देखील तालुक्याच्या दुर्गम डोंगराळ भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. यामध्ये युवकांसह ज्येष्ठांचा देखील मोठा सहभाग दिसून येत होता.

आपल्या भावना व्यक्त करताना सचिन जाधव म्हणाले, 2014 ते 2025 पर्यंत सत्तेपासून आपण दूर होतो. तरीही आपल्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागला. विरोधकांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम केले तरी त्रास सहन करत कार्यकर्ते दादांच्या पाठीशी ठाम उभे राहिले, हे 2024 च्या निवडणुकीत दिसले. कोणताही नेता पाठीशी नसताना, पक्ष नसताना तालुक्यात दादांना 92 हजार मते मिळाली. 1983 पासून ते 2024 पर्यंत कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश करणे गरजेचे आहे. यासाठी आपण भाजपासोबत जाऊया.

योगेश पाटणकर म्हणाले, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली 92 हजार मते कमी नव्हती. ही मते आपल्या वैचारिक विचाराला पाठींबा देणारी होती. कोणतीही सत्ता नसताना एवढे मताधिक्य आपल्याला मिळाले, ही आपली जमेची बाजू आहे. तालुक्यातील हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी आपण सत्ताधारी पक्षात गेलो पाहिजे, असे सांगितले.

शंकर पाटील म्हणाले, 30-35 वर्षे दादांनी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक राजकारण केले. संयमी, निष्कलंक नेतृत्व आपल्याला लाभले आहे. त्यांच्या पाठीशी ठाम राहणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल, तो लवकर घ्या. सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजप हा योग्य पक्ष आहे.

लहुराज कदम म्हणाले, 1983 पासून राममंदिरामध्ये तालुक्याच्या विकासाचे निर्णय घेतले गेले. त्याच राम मंदिरातून आता क्रांतिकारक निर्णय घेऊया. पुन्हा एकदा रखडलेला विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी सत्ताधारी भाजपा पक्षातच प्रवेश करूया. त्याला आमचा पूर्ण पाठींबा राहिल.

माजी सरपंच नारायण डिगे म्हणाले, 40 वर्षे टोळेवाडी हे गाव दादांशी एकनिष्ठ राहिले होते. मात्र विरोधकांनी विकासाचे गाजर दाखवत, खोटी आश्वासने देत प्रवेश करून घेतले. भूस्खलनामुळे गावचा रस्ता खचला. वाहतूक पूर्णपणे बंद झाली असतानाही विरोधकांनी एक रुपयाही रस्त्यावर खर्च केला नाही. मात्र सत्यजितसिंह पाटणकर यांनी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह स्वनिधी उपलब्ध करून रस्त्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे विकासाच्या आड येणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपणही सत्तेत सामील झाले पाहिजे.

यावेळी हिंदूराव पाटील, राजाभाऊ शेलार, राजेश पवार, रमेश मोरे, सुभाष पवार, नथुराम मोरे, शंकर शेडगे, अभिजित कडव, विजयकुमार कदम, शशिकांत पाटील, चेतन कणसे, चंद्रकांत शिर्के, साहेबराव गायकवाड, बाळासाहेब माने, सर्जेराव मोहिते, अॅड. दीपक पाटील, बबन कांबळे, संजय इंगवले आदी कार्यकर्त्यांनी त्यांना गेल्या पंधरा वर्षात आलेले कटु अनुभव व्यक्त करत सत्ताधारी भाजपा पक्षात प्रवेश करण्याबाबत भावना व्यक्त केल्या.

  • सद्यस्थिती नवीन विचारासोबत जावे लागेल-सत्यजितसिंह पाटणकर

कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, आपण गेली 40 वर्षे सर्व जातीधर्मातील लोकांना सोबत घेऊन सकारात्मक विचारांचे राजकारण केले. मात्र आताची परिस्थिती पाहता नवीन संकल्पना व नवीन विचारांच्या सोबत आपल्याला जावे लागणार आहे. सर्व संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी विचारविनिमय करून वरिष्ठ पातळीवर चर्चा करून योग्य तो लवकरच निर्णय घेतला जाईल व तो आपल्याला सांगितला जाईल. निश्चितपणे जिथे जाऊ तेथील लोकांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सत्ता प्राप्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

.....

Advertisement
Tags :

.