For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Bacchu Kadu: बच्चू कडू किसका भिडू?, भिडूगिरीचं नेमकं उद्दिष्ट काय?

01:15 PM Jul 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
bacchu kadu  बच्चू कडू किसका भिडू   भिडूगिरीचं नेमकं उद्दिष्ट काय
Advertisement

अलीकडेच विधानसभेला भाजपच्या प्रवीण तायडे यांनी त्यांना पराभूत केले

Advertisement

By : शिवराज काटकर

सांगली : राजकारणात ‘बोलघेवडा’ ही उपाधी अनेकांना मिळते, पण ‘थेट भिडणारा भिडू’ ही ओळख केवळ बच्चू कडूंना लाभली आहे. अर्थात त्यांनी त्यासाठी सोसलंही खूप आहे. सध्या त्यांच्या परीक्षेची वेळ आहे. अलीकडेच विधानसभेला भाजपच्या प्रवीण तायडे यांनी त्यांना पराभूत केले.

Advertisement

सहा महिन्यात सावरलेल्या कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांसह विविध 17 प्रश्नांवर 7 दिवस उपोषण केले. सरकारने त्यांना आश्वासनही दिले. ते गांधी जयंतीच्या आधी पूर्ण करा नाहीतर मंत्रालयावर मोर्चा काढायची घोषणा केली आहे.

प्रकृती बिघडल्याने आणि आश्वासन मिळाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. परंतु आज त्यांच्या या भिडूगिरीचं नेमकं उद्दिष्ट काय, ते कोणासाठी भिडतात आणि कुणासाठी शांत राहतात, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी पंतप्रधान नरेंद मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांवर त्यांनी टीका केली आहे. पण, ठाम विरोधाचीही त्यांची भूमिका नाही. आता ते विरोधक आहेत की सत्ताधारी असा लोकांना प्रश्न पडतो.

भाजपकडून पडले तरी अनेकदा त्यांनी एकनाथ शिंदे सेनेतील मंत्र्यांविरोधात टीका केली आहे. गेल्या सरकारमध्ये मंत्रीपद हुकल्यावर आरोग्य यंत्रणेतील भ्रष्टाचार, शेतकऱ्यांना मिळणारा कमी भाव, किंवा दिव्यांगांसाठीच्या योजनांमध्ये अनियमितता यावर त्यांनी टीका केली. परंतु हे करताना ते सरकारमधून बाहेर पडले नाहीत.

त्यामुळे आता नेत्यांसह लोकांना प्रश्न पडलाय की ‘बच्चू कडू किसका भिडू?’ काहीवेळा कठोर आणि अनेकदा गप्प राहण्याची त्यांची भूमिका याला कारणीभूत आहे. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या, ओबीसी आरक्षणातील गोंधळ, शिक्षकांच्या भरतीतील अनियमितता यावर त्यांची भूमिका अपेक्षेपेक्षा सौम्य राहिली.

यापुढे जनतेच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा स्वच्छ, स्पष्ट आणि निर्भीड भूमिका घेतली तरच त्यांच्या ‘भिडूगिरी‘ला मूळची धार राहील. ‘अपना भिडू बच्चू कडू’ असे जेव्हा जनतेला म्हणावेसे वाटते नेमके तेव्हाच ते माघार घेतात. अशा माघारीने त्यांनी दिव्यांग मंत्रालय मिळवले. पण, कडू त्या खात्याचे मंत्री बनू शकले नाहीत.

शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून बच्चू कडू पुन्हा जनतेचे भिडू बनतील, अशी अपेक्षा असली तरी सध्याचे राजकारण पाहता ते कठीण दिसते. अशा स्थितीत भविष्यातच समजेल, बच्चू कडू किसका भिडू ठरतात ते! त्यासाठी आधी बच्चू भाऊंना ठरवायचे आहे...ते ‘मी कोणाचा भिडू?’

बच्चू कडू हे विदर्भातील अकोल्यातील अचलपूरचे चार वेळचे आमदार. सध्या माजी आमदार. त्यांनी शेतकरी, बेरोजगार युवक, दिव्यांग, आशा वर्कर्स यांच्यासाठी विधानसभेत आणि रस्त्यावर लढाई लढली. ‘प्रहार‘ संघटनेचे संस्थापक, सुरुवातीस त्यांनी शिवसेनेच्या पाठिंब्याने निवडणूक लढवली होती. नंतर स्वतंत्र ओळख निर्माण करून भाजप-शिवसेना युतीच्या सरकारात मंत्रीही झाले. मात्र कॅबिनेट मंत्रिपदाचे त्यांचे स्वप्न गुवाहाटीला जाऊनही हुकले!

Advertisement
Tags :

.