‘शिशुविक्री’ला कलाटणी...डॉक्टरची कसाबकरणी?
पुरून ठेवलेले तीन भ्रूण जप्त : लिंग निदानानंतर हत्येचा संशय : दवाखान्यात केली तपासणी
बेळगाव : बेळगाव येथे उघडकीस आलेल्या शिशुविक्री प्रकरणाला रविवारी धक्कादायक कलाटणी मिळाली असून कित्तूर येथे भ्रूणहत्येचा प्रकार मोठ्या प्रमाणात चालत होता. पोलीस, महसूल व आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी तिगडोळी, ता.कित्तूर येथील एका शेतवडीत पुरून ठेवलेले तीन भ्रूण जप्त केले आहेत. त्यामुळे गर्भलिंग निदानानंतर भ्रूणहत्या केली जात होती का? असा संशय बळावला आहे. गेल्या रविवार दि. 9 जून रोजी सकाळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निसर्ग ढाब्याजवळ एक महिन्याच्या शिशुची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन महिलांसह पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली होती. सोमवार पेठ, कित्तूर येथे दवाखाना थाटलेल्या डॉ. अब्दुलगफार हुसेनसाब लाडखान (वय 46) मूळचा रा. हंचिनाळ, ता. सौंदत्ती याच्याशी संबंधित शेतजमिनीत रविवारी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील व जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य व कुटुंबकल्याण अधिकारी डॉ. महेश कोनी, प्रांताधिकारी प्रभावती फकिरपूर, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्यासह तीन खात्यांच्या अधिकाऱ्यांनी तिगडोळीजवळील शेतवडीत तपासणी केली. गेल्या वर्षभरात तीन भ्रूण पुरून ठेवल्याचे उघडकीस आले असून खोदाई करून तीनही भ्रूण ताब्यात घेण्यात आले आहेत. डॉ. अब्दुलगफारच्या दवाखान्यात काम करणाऱ्या रोहित कुप्पसगौडर याने दिलेल्या माहितीवरून रविवारी सकाळी शोधमोहीम राबविण्यात आली. कित्तूर येथील दवाखान्यात भ्रूणहत्येनंतर ते भ्रूण शेतवडीत पुरण्यात येत होते.
या शेतवडीपासून जवळच
डॉक्टरचे स्वत:चे फार्महाऊस आहे. त्या परिसरातही भ्रूण पुरल्याचा संशय आहे. त्याने कसण्यासाठी घेतलेल्या जमिनीत चार ठिकाणी खोदाई करण्यात आली. खोदाईत एकूण तीन भ्रूण आढळून आले. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कारवाईला सुरुवात झाली होती. तब्बल तीन तास दुपारी 12 पर्यंत ही मोहीम चालली. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोनी यांनी पत्रकारांना माहिती दिली. डॉ. अब्दुलगफारच्या दवाखान्यात तपासणी करण्यात आली आहे. सध्या त्याच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्याच्यावर कारवाई का केली नाही? यासंबंधी बैलहोंगल तालुका आरोग्याधिकारी एस. एस. सिद्दण्णावर यांना नोटीस देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
भ्रूण विधिविज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविणार
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त करण्यात आलेले भ्रूण विधिविज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. या प्रकारानंतर गर्भलिंग निदानाचा संशय बळावला आहे. त्यामुळेच शेतवडीत आढळलेले भ्रूण मानवी आहेत की जनावरांचे?, त्यांचे लिंग कोणते? आदी प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विधिविज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच यासंबंधी अधिक माहिती उजेडात येणार आहे. सध्या दि. 9 ते 16 जूनपर्यंत घडलेल्या घटनाक्रमाचा आरोग्य विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देण्यात येणार आहे.