ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद मेमोरियल
तहरीक मुस्लीम शब्बन संघटनेकडून घोषणा
वृत्तसंस्था/ हैदराबाद
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मोठ्या वादादरम्यान बाबरी मशिदीचा पाया रचण्यात आल्यावर आता ग्रेटर हैदराबादमध्येही बाबरी मशीद मेमोरियल निर्माण करण्याची घोषणा झाली आहे. तहरीक मुस्लीम शब्बन नावाच्या संघटनेने ही घोषणा केली आहे. संघटनेचे अध्यक्ष मुश्तका मलिक यांनी मशिदीचे मेमोरियल कधी उभारले जाणार असल्याची माहिती लवकरच घोषित केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशिदीचे एक स्मारक निर्माण करण्यात येईल आणि त्याच परिसरात अनेक कल्याणकारी संस्थाही स्थापन करण्यात येणार आहेत. अयोध्येत बाबरी मशीद उभारण्यासाठी बाबरकडून कुठलीही आर्थिक मदत देण्यात आली होती याचा कुठलाच पुरावा नाही. कदाचित एखाद्या स्थानिक इसमाचे नाव बाबर असेल आणि त्याचे नाव मशिदीला देण्यात आले असू शकते. परंतु भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बाबरला मुद्दा करू इच्छित असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.
कुणालाही बाबरच्या नावामुळे समस्या होण्याची गरज नाही. हा मुद्दा केवळ एक राजकीय अस्त्र ठरला असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. तुलसीदास यांच्या रामचरित मानसमध्येही राम मंदिराचा कुठलाच उल्लेख करण्यात आला नव्हता, तर बाबरी मशीद उभारल्याच्या 60 वर्षांनी रामचरित मानस रचण्यात आले होते. राम चरित मानसमध्ये मंदिर तोडल्याचाहीही उल्लेख नाही. अकबरच्या महालात होम अन् पूजा देखील व्हायची. तुलसीदास आणि अकबर यांच्यात संवादही होता. मान सिंह हे अकबरचे सैन्यप्रमुख होते. बाबरीच्या मुद्द्यामुळे देशात विविध धर्मांमधील सौहार्द संपुष्टात आल्याचा दावा मलिक यांनी केला आहे.