बबलादी मठाच्या मठाधीशांची आर्थिक व्यवहारातून चौकशी
प्रतिनिधी / बेळगाव
जमखंडी, जि. बागलकोट येथील होसा बबलादी मठाच्या मठाधीशांची सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. शुक्रवारी रात्री गोकाक पोलीस स्थानकात बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली असून शनिवारीही चौकशी करून त्यांची सुटका करण्यात आली आहे.
भविष्य वर्तवण्यासाठी उत्तर कर्नाटकात बबलादी मठ प्रसिद्ध आहे. या मठाचे सदाशिव हिरेमठ स्वामीजी यांना गोकाक येथील महालक्ष्मी अर्बन को-ऑप. बँकेतील गैरव्यवहारासंबंधी सीआयडीने ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. गैरव्यवहारात अडकलेल्या बँकेच्या एका पदाधिकाऱ्याने या मठाला सुमारे 60 ते 80 लाखांची देणगी दिली आहे. त्यामुळेच स्वामीजींचीही चौकशी केल्याचे समजते. चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांच्या सीआयडीचे पथक गोकाकमध्ये दाखल झाले होते. शुक्रवारी रात्रीपासून स्वामीजींना अटक झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. शनिवारी बबलादी मठाच्या भक्तांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून स्वामीजींना अटक झाली नाही, स्वामीजी व मठाला बदनाम करण्यासाठी अटकेची अफवा पसरविण्यात येत आहे, असे स्पष्ट केले आहे. स्वामीजींची केवळ चौकशी झाली आहे, त्यांना अटक झाली नाही. होसा बबलादी मठाला काही जणांनी देणग्या दिल्या होत्या. मठाच्या विकासासाठी त्याचा वापर करण्यात आला आहे. स्वामीजींची चौकशी पहिल्यांदाच झाली नाही. 6 जानेवारी व 10 फेब्रुवारी रोजीही त्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर 21 मार्च रोजी तिसऱ्यांदा त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.