For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

बाहुबली राष्टाध्यक्षांविरोधात अॅलेक्सी नोवेल्नीची एकाकी झुंज

06:44 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाहुबली राष्टाध्यक्षांविरोधात अॅलेक्सी नोवेल्नीची एकाकी झुंज

युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण होण्यास केवळ नऊ दिवस बाकी असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी आपले विरोधक अॅलेक्सी नोवेल्नी यांच्यावर विषप्रयोग करुन त्याला ठार मारले. 15 फेब्रुवारीला मरण पावलेल्या अॅलेक्सी यांचे पार्थिव अज्ञात स्थळी ठेवण्यात आले होते. शरीरावर केलेला विषप्रयोग निष्प्रभ झाल्यानंतरच पोलिसांच्या कडक पहाऱ्यात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला त्याच्या मातोश्री वगळता पत्नी व मुलीसहीत कुटुंबातील कोणीही उपस्थित राहू शकले नाहीत.

Advertisement

रशियाच्या राजकारणात प्रवेश करून दोन तपे पूर्ण करणारे विरोधी पक्षनेते अॅलेक्सी नोवेल्नी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी रशियाच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना या जगाचा आकस्मिक निरोप घेतला. 4 जून 1976 साली जन्मलेल्या अॅलेक्सी नोवेल्नी यांनी आपल्या 47 व्या वर्षी देहत्याग केला असला तरी त्यांनी रशियाच्या युवा शक्तीला अन्यायाविरोधात लढण्याची दिलेली ताकत

प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन कित्येक दिवस लोटले तरी त्यांना साश्रू नयनांनी आदरांजली वाहण्यासाठी रशियातून येणाऱ्या समर्थकांचा लोंढा वाढतच आहे.

Advertisement

अॅलेक्सी नोवेल्नी यांनी आपल्या अल्प आयुष्याच्या कारकिर्दीत रशियातील युवा पिढीपुढे अन्यायाविरोधात लढण्याची स्फूर्ती देऊन रशियाच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ते अजरामर झाले. विद्यमान राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन वर्ष 2000 साली पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाले होते. त्याचवर्षी अॅलेक्सी नोवेल्नी यांनी लिबरल याब्लाको या पक्षात आपली राजकीय कारकीर्द घडविण्यासाठी प्रवेश केला होता. नोवेल्नी यांची कारकीर्द घडत असतानाच 2011 साली रशियातील सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांविरोधात अॅलेक्सी नोवेल्नी यांच्या नेतृत्वाखाली क्रेमलीनमध्ये ऐतिहासिक आंदोलन सुरु होते.

Advertisement

रशियातील भ्रष्टाचाराविरोधात अॅलेक्सी नोवेल्नी यांनी रान उठवून युवा वर्गाला आकर्षित करण्यास सुरुवात केल्याने रशियाचे सर्वेसर्वा बनलेल्या पुतीन याने आपल्या सिंहासनाला सुरुंग लावणारा विरोधक जन्माला आल्याचे हेरले. 2011 पासून पुतीन यांनी नोवेल्नीला आपला शत्रू नंबर वन मानण्यास सुरुवात केली होती. नोवेल्नी यांनी ब्लादिमीर पुतीन यांना पुराव्यासहीत जनतेच्या दरबारात उघडे पाडण्यास सुरुवात केली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भ्रष्टाचारी म्हणण्याची धमक नोवेल्नी यांनी दाखविल्याने त्यांच्या विरोधात सरकारी यंत्रणा हात धुवून लागली.

रशियातील युवा शक्तीने मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यास सुरुवात केल्याने पुतीन प्रशासनाने नोवेल्नी यांना विविध प्रकारच्या खटल्यात गोवून देशातील कोणत्याही निवडणुकांत भाग घेण्यास मनाई करणारे आदेश जारी केले. नोवेल्नी यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर शस्त्रसामुग्रीचे आणि तेल खरेदी विक्रीतील दलालांकडून मिळालेल्या भ्रष्टाचारी निधीतून शेकडो कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या राजवाड्याचे दर्शन घडविणारा व्हिडिओ जारी केला. अत्यंत संशोधनात्मक पद्धतीचा हा व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या अवघ्या काही दिवसांत 10 कोटींच्या घरात पोहोचली होती. रशिया आणि युरोपात हा व्हिडिओ अगदी तेजीत पसरल्याने राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी साम दाम दंडाचा वापर करून नोवेल्नीला आवर घालण्याचा संकल्प सोडला. नोवेल्नीच्या संघटना अतिरेकी कारवायांत सहभागी असल्याचे आरोप करून त्यावर बंदी घातली. त्यानंतर रशियाच्या 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नोवेल्नी यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले.

सार्वत्रिक निवडणुक लढवण्यास मनाई केल्यानंतर त्याच्या मागावर रशियन गुप्तचरांना ठेवले. अर्थात ब्रिटिश आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी नोवेल्नी यांना सावध केले होते. पण त्यांनी देशबांधवांच्या कल्याणासाठी रशियाची भूमीतच राहून लढण्याचा निर्धार केला. या सार्वत्रिक निवडणुकांनंतर नोवेल्नी यांच्यावर अनेक आरोप ठेवून त्याला अटक केली. नोवेल्नी हा राजकीय कैदी असतानाही त्याला क्रूर कैद्यांसाठी असलेल्या तुरुंगात ठेवण्यात येऊ लागले. दर आठवड्याला त्याच्या कैदेचे ठिकाण बदलण्यात येत असे. पुढे त्याला सायबेरीयातील गलिच्छ तुरुंगातही पाठविण्यात आले होते. तिथे त्याला जेवणातून व अन्य माध्यमातून विषाचे डोस पाजण्यात येत असत.

अशाचप्रकारे ऑगस्ट 2020 मध्ये त्याला एका कैदेतून दुसऱ्या कैदेत नेत असताना प्रकृती अस्वस्थतेने ते विमानात कोसळले. विमानाला आपत्कालीन खाली उतरावे लागले. या विमानात मृतावस्थेत असलेल्या नोवेल्नीला तेथील लोकांनी पाहताक्षणी वाऱ्यासारखी बातमी सर्वत्र पसरली. या घटनेने जगभरात संताप व्यक्त करण्यात आला. जर्मनीतील एका चॅरिटेबल ट्रस्टच्या हस्तक्षेपानंतर रशियन अधिकाऱ्यांनी नोवेल्नी यांना बर्लिनमधील इस्पितळात उपचार करून घेण्यास परवानगी दिली. बर्लिन येथील उपचारा दरम्यान केलेल्या विविध चाचण्यात त्याच्यावर नोव्हिचोक या मज्जातंतूंवर आघात करणाऱ्या विषारी मात्रेचा प्रयोग केल्याचे निष्पन्न झाले. नोव्हिचोक नर्व एजंटचा वापर करून लंडनस्थित रशियाचे माजी गुप्तचर सेर्जी श्रीपाल आणि त्याची मुलगी युलिया यांना ठार केले होते.

या घटनेनंतरही नोवेल्नी यांनी पुन्हा एकदा 17 जानेवारी 2021 रोजी रशियात पाय ठेवले. पुन्हा त्यांना रशियन पोलिसांनी अटक केली. या अटकेनंतर त्यांना थेट मृत्युनंतर पंधरा दिवसांनी एका स्मशानभूमीत दफन करून टाकले. सध्या रशियात अॅलेक्सी नोवेल्नी समर्थकांनी रशियातील विविध शहरांत निदर्शने चालविली असून येणाऱ्या रशियन निवडणुकीत त्याचा काही परिणाम होतो का ते पाहावे लागेल.   आधुनिक जगतात एका बाहुबली राष्ट्राध्यक्षाविरुद्ध एकाकी दोन हात करणारा लढवय्या असेच अॅलेक्सी नोवेल्नी यांचे वर्णन करावे लागेल.

प्रशांत कामत

Advertisement
×

.