बी.के.मॉडेल हायस्कूलचा 20 पासून शतकमहोत्सव
खासदार तेजस्वी सूर्या यांच्यासह मान्यवरांची राहणार उपस्थिती :
प्रतिनिधी/ बेळगाव
उत्तमोत्तम विद्यार्थी घडवणाऱ्या बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. के. मॉडेल हायस्कूलचा शतकमहोत्सव भव्य प्रमाणात 20 ते 26 डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी खासदार तेजस्वी सूर्या, खासदार इराण्णा कडाडी, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, डॉ. गिरीराज करजगी, अभिनेते सचिन पिळगावकर, डॉ. गिरीश ओक आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यकारी समितीचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी दिली.
यंदा बी. के. मॉडेल शाळा शतकमहोत्सव साजरा करत असून यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. संघटनेबरोबरच स्काऊट्स, एनसीसी व अटल लॅब व स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून शाळेचा विकास सुरू आहे. दि. 19 रोजी स्टँडअप् कॉमेडियन गंगावती प्राणेश यांचा कार्यक्रम होणार आहे. दि. 20 रोजी सकाळी 7.30 वा. भव्य प्रमाणात प्रभातफेरी निघणार आहे. त्यानंतर होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमात खासदार तेजस्वी सूर्या, इराण्णा कडाडी उपस्थित राहणार आहेत.
दि. 21 रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी विद्यार्थी व निवृत्त प्राचार्य बसवराज जगजंपी उपस्थित राहणार असून दि. 22 रोजी डॉ. गुरुराज करजगी यांचे व्याख्यान होणार आहे. दि. 23 डिसेंबर रोजी बॉडीबिल्डींग शो होणार असून त्यानंतर माजी विद्यार्थ्यांतर्फे संगीत कार्यक्रम होणार आहे. दि. 24 रोजी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर तर दि. 25 रोजी अभिनेते डॉ. गिरीश ओक उपस्थित राहणार आहेत. दि. 26 रोजी निर्माते व दिग्दर्शक नागतीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या अनुभव कथनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
महोत्सवासाठी तयारी सुरू असून शाळेची रंगरंगोटी करण्यात आली आहे. मैदान सुसज्ज करण्यात येत आहे. बी. के. मॉडेल हायस्कूलच्या मागे बेळगाव लॉज व अशोक पेट्रोल पंपच्या मागे पार्किंगची सोय करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शाळेचे माजी विद्यार्थी उत्साहाने या महोत्सवाच्या तयारीला लागले असून स्वयंस्फूर्तीने देणगी देत आहेत. त्यांचासुद्धा मेळावा दि. 21 रोजी होणार आहे, अशी माहिती अविनाश पोतदार यांनी दिली. याशिवाय खासदार जगदीश शेट्टर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, महसूल मंत्री कृष्णबैरेगौडा, आजी-माजी आमदार उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारी समितीचे सचिव सीए श्रीनिवास शिवणगी यांनी संस्थेचा इतिहास सांगितला. ते म्हणाले, 2 फेब्रुवारी 1925 रोजी सात शिक्षणप्रेमींनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचे ठरविले आणि मॉडेल इंग्लीश स्कूलची स्थापना झाली. याचे नेतृत्व डी. व्ही. बेळवी यांनी केले. त्यांच्याच नेतृत्वाखाली 1946 मध्ये बेळगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. कालौघात सोसायटीने बी. के. मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल, एन. एस. प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूल, वासुदेव घोटगे मॉडेल इंग्लीश मीडियम स्कूल, विठ्ठलाचार्य शिवणगी प्री प्रायमरी आणि प्रायमरी स्कूल, मॉडेल सायन्स अँड कॉमर्स पीयू कॉलेज, श्रीदेवी दासप्पा शानभाग मॉडेल प्रायमरी इंग्लीश स्कूल असा संस्थेचा विस्तार केला.
विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन डी. व्ही. बेळवी यांनी पाटील गल्ली येथील आपली इमारत देऊ केली व दीड एकर जागाही माफक दरात संस्थेला दिली. आणखी एक देणगीदार बळवंतराव दातार यांनी गृहमंत्री असताना संस्थेला जागा मिळवून दिली. तेथे शाळांच्या इमारती उभ्या राहिल्या. मराठी आणि कानडी त्याचबरोबर आता इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. या शाळेने उत्तमोत्तम विद्यार्थी घडविले असून काहीजण आयएएस अधिकारी, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, व्यावसायिक, पोलीस अधिकारी व सरकारी अधिकारी म्हणून आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. पत्रकार परिषदेला महोत्सवाचे चेअरमन कृष्णकुमार पै, उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी, सचिव शैलजा चाटे, सहसचिव अरविंद हुनगुंद, मुख्याध्यापक सुरेश जोशी आदी उपस्थित होते.