आझमनगर पीके क्वॉर्टर्स संबंधितांना तातडीने द्या
महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांची सूचना : सफाई कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या क्वॉर्टर्सला भेट देऊन पाहणी
बेळगाव : महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी सोमवार दि. 1 रोजी आझमनगर येथील सफाई कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या पीके क्वॉर्टर्सला भेट देऊन पाहणी केली. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून ज्या सफाई कर्मचाऱ्यांना पीके क्वॉर्टर्स मंजूर झाले आहेत, त्यांना ते स्वाधीन करावेत, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. शहर व परिसरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना महानगरपालिकेकडून पीके क्वॉर्टर्स उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी इमारती उभारण्यात आल्या आहेत. अनेक सफाई कर्मचाऱ्यांना पीके क्वॉर्टर्स मंजूर झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांना ते हस्तांतरित करण्यात आलेले नाही. त्यामुळे पीके क्वॉर्टर्सविना सफाई कर्मचारी वंचित असल्याने सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तत्कालीन मनपा आयुक्त शुभा बी. यांच्याकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्यांच्या कार्यकाळात सफाई कर्मचाऱ्यांना पीके क्वॉर्टर्स मिळाले नाहीत.
पीके क्वॉर्टर्स परिसरात स्वच्छता
नूतन मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी पदभार स्वीकारताच सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आझमनगर येथील पीके क्वॉर्टर्सची पाहणी करणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच अधिकारी आझमनगरमध्ये दाखल झाले. बांधकाम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटल्याने सफाई कर्मचाऱ्यांचे पीके क्वॉर्टर्स धूळखात पडले होते. त्यामुळे तातडीने सफाई कर्मचाऱ्यांना बोलावून पीके क्वॉर्टर्स परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दुपारनंतर मनपा आयुक्त कार्तिक एम. त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या व इतर अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. पीके क्वॉर्टर्समधील काही कामे अद्याप बाकी आहेत. त्यामुळे येत्या 10 दिवसांत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत व त्यानंतर संबंधितांना पीके क्वॉर्टर्स स्वाधीन करावेत, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. यावेळी महापालिकेचे प्रथम दर्जा साहाय्यक भरत तलवार व इतर अधिकारी उपस्थित होते.