तुरुंगातून बाहेर पडताच आझम यांना पुन्हा वाय श्रेणीची सुरक्षा
वृत्तसंस्था/ रामपूर
समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री आझम खान यांची सुरक्षा पुन्हा बहाल करण्यात आली आहे. आझम यांना वाय श्रेणीची सुरक्षा पुन्हा पुरविण्यात आली आहे. 23 महिने तुरुंगात काढल्यावर आझम हे जामिनावर बाहेर पडले आहेत. आता त्यांच्या सुरक्षेत एक सुरक्षारक्षक आणि गनर तैनात करण्यात आला आहे.
सप नेते आझम यांना यापूर्वी वाय श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. परंतु न्यायालयात दोषी ठरल्यावर त्यांचे विधानसभा सदस्यत्व संपुष्टात आले होते. यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. परंतु आता पुन्हा वाय श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तुरुंगातून घरी आल्यापासून आझम यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येत लोक पोहोचत आहेत, हे पाहता पोलीस प्रशासनाने त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा पुन्हा प्रदान केली आहे. यापूर्वी आझम खान यांनी सुरक्षा स्वीकारण्यास नकार दिला होता. परंतु आता पुन्हा एकदा त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी घेतली भेट
भाजप सरकारने सप नेते आझम खान यांच्यावर जुलूम केले आहेत. हा जुलूम लोकशाही व्यवस्थेवरील काळा डाग असल्याचे म्हणत सपचे माजी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी आझम खान यांची भेट राजकीय उद्देशाने नव्हे तर औपचारिक अन् आदरभावाने झाल्याचा दावा केला. भाजपने राजकीय गैरभावनेने प्रेरित होत आझम यांच्यावर बकरी चोरीसारखे आरोप करत त्यांच्या पूर्ण परिवाराला अनेक वर्षांपर्यंत छळले आहे. अशाप्रकारचा अत्याचार आणीबाणीतही कुणासोबत झाला नव्हता असा आरोप मौर्य यांनी केला.