‘आयुषमान’ 70 वर्षांवरील नागरिकांनाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अधिकृत घोषणा : 12,850 कोटींच्या आरोग्य प्रकल्पांचाही प्रारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘आयुषमान भारत’ योजना यापुढे 70 वर्षांवरील सर्व नागरिकांनाही लागू करण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मंगळवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून या योजनेचा अशा प्रकारे विस्तार करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांनी 12 हजार 850 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचीही घोषणा केली आहे. आयुषमान योजनेच्या विस्ताराच्या घोषणेने देशभरातील 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोठा दिलासाच मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्थे’च्या द्वितीय टप्प्याचाही शुभारंभ करण्यात आला आहे. या टप्प्यात दिल्लीत एका पंचकर्म रुग्णालयाची स्थापना केली जाणार आहे. तसेच एक आयुर्वेदिक औषध उत्पादन केंद्र, क्रीडा औषधांच्या निर्मितीचे केंद्र, एक मध्यवर्ती वाचनालय, एक माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्टअप निर्माण केंद्र आणि 500 आसनांचे सभागृह यांची निर्मिती केली जाणार आहे. हे सर्व प्रकल्प शरीर स्थास्थ्याशी संबंधित आहेत.
आरोग्य ड्रोन सेवेचा शुभारंभ
ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात करण्याच्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील 11 स्थानिक ‘एम्स’ आरोग्य सेवा संस्थांमध्ये ड्रोन सेवेचा प्रारंभ केला. या सेवेमुळे देशाच्या दुर्गम भागातही वैद्यकीय सेवा वेगवान पद्धतीने पोहचविणे सुलभ होणार आहे. या एम्स आरोग्य सेवा संस्था, ऋषिकेश, बीबीनगर, गुवाहाटी, भोपाळ, जोधपूर, पाटणा, बिलासपूर, उत्तर प्रदेश, रायपूर, मंगलगिरी आणि इंफाळ या शहरांमध्ये आहेत. या संस्थांना ड्रोनसेवेची उपलब्धी करून दिल्याने त्यांची सेवाक्षमता आणि वेग वाढणार आहे. ऋषिकेश येथील एम्स संस्थेला तातडीच्या सेवेसाठी वैद्यकीय हेलिकॉप्टरही देण्यात येईल.
वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन
मंगळवारच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वैद्यकीय महाविद्यालयांचेही उद्घाटन केले आहे. ही वैद्यकीय महाविद्यालये मध्यप्रदेशातील मंदसौर, निमच आणि सिओनी या शहरांमध्ये निर्माण करण्यात आली आहेत. याशिवाय हिमाचल प्रदेशातील बिलासपूर, पश्चिम बंगालमधील कल्याणी, बिहारमधील पाटणा, उत्तर प्रदेशातील गोरखपूर, मध्यप्रदेशातील भोपाळ, आसाममधील गुवाहाटी आणि नवी दिल्ली येथील एम्स संस्थांच्या आरोग्य सेवेचा विस्तार करण्याच्या योजनांचेही त्यांनी ऑनलाईन उद्घाटन केले. छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथे सुपरस्पेशालिटी वैद्यकीय रुग्णालय आणि ओडिशातील बरगाह येथे एका तातडीच्या रुग्णसेवा केंद्राचे उद्घाटन त्यांनी केले.
नर्सिंग महाविद्यालांचा कोनशीला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पाच राज्यांमध्ये नर्सिंग महाविद्यालयांच्या कोनशीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्थापन केल्या आहेत. ही महाविद्यालये मध्यप्रदेशात शिवपुरी, रतलाम, खांडवा, राजघर आणि मंदसौर येथे स्थापन केली जाणार आहेत. त्यांनी विविध राज्यांमध्ये स्थापन होणार असलेल्या 21 तात्काल उपचार केंद्रांच्याही कोनशीला स्थापन केल्या. ही केंद्रे हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान आणि मणिपूर या राज्यांमध्ये स्थापन होणार आहेत, अशी माहिती नंतर केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
‘यू विन’ पोर्टलचाही प्रारंभ
गर्भवती महिलांना उपयुक्त ठरेल अशा ‘यू विन’ नामक पोर्टलचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या पोर्टलच्या माध्यमातून लसीकरण प्रक्रियेचेही डिजिटलायझेन करण्यात आले आहे. गर्भवती महिला आणि अर्भकांना जीवरक्षक लसींचा पुरवठा या पोर्टलच्या माध्यमातून केला जाणार आहे.
आरोग्य व्यावसायिकांसाठी पोर्टल
आरोग्य व्यावसायिक आणि आरोग्य संस्थांसाठीही एका विशेष पोर्टलचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या पोर्टलमध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या आरोग्यसंस्था आणि आरोग्य व्यावसायिक यांच्या माहितीसंबंधीची मध्यवर्ती विदा (डाटा) उपलब्ध असेल. या माहितीचा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे.
औषध उत्पादन आणि साधने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात औषधे आणि वैद्यकीय साधने यांचे घाऊक उत्पादन करण्यासाठी पाच उत्पादन केंद्राचे उद्घाटन केले. ही केंद्रे गुजरातमधील वापी, तेलंगणातील हैदराबाद, कर्नाटकातील बेंगळूर, आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि हिमाचल प्रदेशातील नालागढ येथे स्थापन झाली आहेत.
अनेक प्रकल्पांचे उद्घाटन, कोनशीला
ड पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध राज्यांमधील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन
ड आयुषमान योजनेचा लाभ 70 वर्षांवरील सर्व वृद्धांना मिळाल्याने समाधान
ड ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला प्रोत्साहनासाठी घाऊक औषध उत्पादन केंद्रे
ड अनेक वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंग महाविद्यालयांचेही केले उद्घाटन