आयुषचे पहिले जेतेपद, तन्वी उपविजेती
तन्वीची झुंजार लढत, बीवेन झँग महिलांत विजेती
वृत्तसंस्था/ आयोवा, अमेरिका
भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरवरील पहिले जेतेपद पटकावताना येथे झालेली यूएस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. मात्र तन्वी शर्माला महिला एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
20 वर्षीय आयुष शेट्टी हा 2023 ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यविजेता असून त्याने अंतिम फेरीत कॅनडाच्या ब्रायन यांगचा 21-18, 21-13 अशा सरळ गेम्सनी केवळ 47 मिनिटांत पराभव करून जेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत त्याने पिछाडी भरून काढत चौ तिएन चेन या अग्रमानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का दिला होता. यांगवर मिळविलेला त्याचा हा तिसरा विजय आहे. याआधी त्याने मलेशिया व तैपेई ओपन स्पर्धेतही त्याला हरविले होते. महिला एकेरीत 16 वर्षीय बिगरमानांकित तन्वी शर्माला संघर्ष करूनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या अग्रमानांकित बीवेन झँगने तिला अंतिम फेरीत 11-21, 21-16, 10-21 असे हरवित जेतेपद पटकावले. तन्वीची ही पहिलीच वर्ल्ड टूर फायनल होती.
आयुष-यांग अंतिम लढत समतोलपणे सुरू झाली आणि दोघांची 6-6 अशी बरोबरी झाली. पण चौथ्या मानांकित शेट्टीने अनेक विजयी फटके मारत मध्यंतराला 11-6 अशी आघाडी घेतली. यांगने नंतर हे अंतर 13-11 असे कमी केले आणि 16-16 वर त्याला गाठले. शेट्टीने पुन्हा नियंत्रण मिळविले आणि उंच उडी घेत मारलेल्या स्मॅशवर पहिला गेम जिंकून आघाडी घेतली.
दुसऱ्या गेममध्ये आयुषने जोरदार सुरुवात करीत 7-2 अशी आघाडी मिळविली. यांगने त्याला काही वेळात गाठले. पण आयुषने संयमी खेळ करीत फटक्यांत वैविध्यता आणि भक्कम बचाव करीत यांगला फार संधी मिळू दिली नाही. 17-12 अशा आघाडीनंतर आयुषने क्रॉसकोर्ट पंच मारल्यानंतर ताकदवान स्मॅशवर गेमसह सामना संपवत पहिले वर्ल्ड टूर टायटल मिळविले. याआधीही त्याने 2023 मध्ये ओडिशा मास्टर्स सुपर 100, 2023 मध्ये बहरीन आंतरराष्ट्रीय आणि 2024 मध्ये डच ओपन या स्पर्धांचीही अंतिम फेरी गाठली होती.
तन्वी व झँग यांच्या लढतीत तन्वीला स्थिरावण्यास वेळ लागला. तोपर्यंत झांगने 11-5 अशी आघाडी घेतली होती आणि नंतर तिने हा गेमही घेतला. दुसऱ्या गेममध्ये तन्वीने आक्रमक खेळ करीत 4-0 अशी आघाडी घेतली आणि झँगने दीर्घ रॅलीजमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तिने आघाडी कायम राखली. ब्रेकला तिने 11-9 अशी बढत मिळविली होती. तन्वीने आक्रमक धोरण पुढे चालू ठेवत झँगला चुका करण्यास भाग पाडले आणि हा गेम जिंकून तन्वीने बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये मात्र तन्वीला हा जोम कायम राखता आला नाही आणि झँगने 11-4 अशी मजल मारत नंतर गेमसह जेतेपदही निश्चित केले.