आयुष, उन्नती उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ तैपेई
भारताचे युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी व उन्नती हुडा यांनी तैपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील प्रभावी प्रदर्शन पुढे चालू ठेवताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर संघर्षपूर्ण विजय मिळवित उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
उन्नतीने स्थानिक खेळाडू हंग यि-टिंग हिच्यावर 52 मिनिटांच्या संघर्षानंतर 21-8, 19-21, 21-19 असा विजय मिळवित आगेकूच केली. उन्नती ही 2022 ओडिशा मास्टर्स व 2023 अबु धाबी मास्टर्सची चॅम्पियन आहे. त्याआधी 17 वर्षीय उन्नतीने जागतिक क्रमवारीत 65 व्या स्थानावर असणाऱ्या तैपेईच्या लिन सिह युनचा 212012, 21-7 असा पराभव केला होता. तिची पुढील लढत जपानच्या अग्रमानांकित तोमोका मियाझाकीशी होईल. मियाझाकीने तैपेईच्या सियांग लिनवर 17-21, 21-8, 21-17 अशी मात करीत आगेकूच केली.
पुरुष एकेरीत 20 वर्षीय आयुष शेट्टीने आधीच्या फेरीत किदाम्बी श्रीकांतला हरविले होते. उपांत्यपूर्व फेरीत त्याने कॅनडाच्या सातव्या मानांकित ब्रायन यांगला 16-21, 21-19, 21-14 असा पराभवाचा धक्का दिला. एक तास 11 मिनिटे ही झुंज रंगली होती. या उदयोन्मुख भारतीय खेळाडूची पुढील लढत तैपेईचा चोऊ तिएन चेन किंवा इंडोनेशियाचा मोह झाकी उबेदिल्लाह यापैकी एकाशी होईल.