आयुशचा नाराओकाला धक्का, लक्ष्य, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत
हाँगकाँग ओपन बॅडमिंटन : एचएस प्रणॉय, किरण जॉर्ज, पांडा भगिनी यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/हाँगकाँग
भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू आयुश शेट्टीने हाँगकाँग ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत धक्कादायक निकाल देताना 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविलेल्या जपानच्या कोदाय नाराओकाचे आव्हान संघर्षपूर्ण लढतीत संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. याशिवाय एकेरीत लक्ष्य सेनने एचएस प्रणॉयचा पराभव केला तर दुहेरीत सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनीही आगेकूच केली. मात्र किरण जॉर्ज आणि रुतुपर्णा व श्वेतपर्णा पांडा भगिनी पराभूत झाले.
कर्नाटकच्या 20 वर्षीय आयुश शेट्टीने गेल्या जूनमध्ये यूएस ओपन सुपर 300 स्पर्धा जिंकली होती. त्याने येथे आक्रमक खेळ व चपळ हालचालीच्या बळावर माजी जागतिक द्वितीय मानांकित नाराओकाचा 21-19, 12-21, 21-14 असा असा 72 मिनिटांच्या चुरशीच्या लढतीत पराभव केला. आयुशची उपांत्यपूर्व लढत लक्ष्य सेनशी होईल. लक्ष्य सेनने आपल्याच देशाच्या एचएस प्रणॉयचा 15-21, 21-18, 21-10 असा पराभव करून आगेकूच केली.
पुरुष दुहेरीत जागतिक नवव्या मानांकित सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनीही आगेकूच केली. त्यांनी थायलंडच्या सुकफुन व तीरारत्साकुल या जोडीचा तीन गेम्सच्या लढतीत पराभव केला. पहिला गेम थायलंडच्या जोडीने जिंकल्यानंतर नंतरचे दोन्ही गेम जिंकून भारतीय जोडीने पुढील फेरी गाठली. महिला दुहेरीत रुतुपर्णा व श्वेतपर्णा या पांडा भगिनींना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना चीनच्या पाचव्या मानांकित लि यि जिंग व लुओ झू मिन यांनी 21-13, 21-7 असे हरविले.