आयुष शेट्टी, लक्ष्य सेन, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत
ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन : एचएस प्रणॉय, के.श्रीकांत यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/सिडनी, ऑस्ट्रेलिया
युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी व वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविणारा लक्ष्य सेन यांनी येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र एचएस प्रणॉय व किदाम्बी श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात आले. याशिवाय येथे अग्रमानांकन मिळालेल्या सात्विकसाईराज व चिराग शेट्टी या जोडीनेही दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सात्विक-चिराग यांनी चिनी तैपेईच्या सु चिंग हेन्ग व वु गुआन झुन यांच्यावर केवळ 37 मिनिटांत 21-18, 21-11 असा विजय मिळवित आगेकूच केली. त्यांची लढत पाचव्या मानांकित इंडोनेशियाच्या फजर अल्फियान व मुहम्मद शोहिबुल फिकरी यांच्याशी होईल. यावर्षी यूएस ओपन सुपर 300 स्पर्धा जिंकणाऱ्या आयुष शेट्टीने चौथ्या मानांकित जपानच्या कोदाय नाराओकाला 21-17, 21-16 असा पराभवाचा धक्का दिला.