For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयुष शेट्टी, लक्ष्य सेन, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

06:00 AM Nov 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
आयुष शेट्टी  लक्ष्य सेन  सात्विक चिराग उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन : एचएस प्रणॉय, के.श्रीकांत यांचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था/सिडनी, ऑस्ट्रेलिया

युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी व वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविणारा लक्ष्य सेन यांनी येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मात्र एचएस प्रणॉय व किदाम्बी श्रीकांत यांचे आव्हान संपुष्टात आले. याशिवाय येथे अग्रमानांकन मिळालेल्या सात्विकसाईराज व चिराग शेट्टी या जोडीनेही दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सात्विक-चिराग यांनी चिनी तैपेईच्या सु चिंग हेन्ग व वु गुआन झुन यांच्यावर केवळ 37 मिनिटांत 21-18, 21-11 असा विजय मिळवित आगेकूच केली. त्यांची  लढत पाचव्या मानांकित इंडोनेशियाच्या फजर अल्फियान व मुहम्मद शोहिबुल फिकरी यांच्याशी होईल. यावर्षी यूएस ओपन सुपर 300 स्पर्धा जिंकणाऱ्या आयुष शेट्टीने चौथ्या मानांकित जपानच्या कोदाय नाराओकाला 21-17, 21-16 असा पराभवाचा धक्का दिला.

Advertisement

ही लढत 68 मिनिटे चालली होती. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱ्या नाराओकावरील त्याचा हा या वर्षातील दुसरा विजय आहे. याआधी हाँगकाँग ओपनमध्ये आयुषने त्याला हरविले होते. त्याची पुढील लढत आपलाच सहकारी सतावा मानांकित लक्ष्य सेनशी होईल. लक्ष्य सेनने चिनी तैपेईच्या चि यु जेनवर 21-17, 13-21, 21-13 अशी 63 मिनिटांच्या खेळात मात करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. एचएस प्रणॉयला मात्र पुढील फेरी गाठता आली नाही. त्याला आठव्या मानांकित इंडोनेशियाच्या फरहान अल्वीने त्याला 21-19, 21-10 असे हरविले. अनुभवी के. श्रीकांतचे आव्हानही उपउपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. जपानच्या शोगो ओगावाने त्याला 22-20, 21-16 असे हरवित आगेकूच केली. श्रीकांतने मलेशिया मास्टर्समध्ये उपविजेतेपद मिळविले होते.

Advertisement
Tags :

.