अयुब, शकीलच्या अर्धशतकांनी पाकला सावरले,
बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी, पहिला दिवस : शोरिफुल, हसन मेहमुदचे प्रत्येकी 2 बळी
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
हिरवळयुक्त खेळपट्टीचा आणि अनुकूल वातावरणाचा पुरेपूर लाभ घेत बांगलादेशच्या गोलंदाजांनी पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकला अडचणीत आणले होते. पण सईम अयुब व सौद शकील यांनी झळकवलेल्या अर्धशतकांमुळे पाकचा डाव सावरला गेला. पावसाच्या अडथळ्यामुळे उशिराने सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशीअखेर पाकने पहिल्या डावात 41 षटकांत 4 बाद 158 धावा जमविल्या होत्या. अयुबने 56 धावा केल्या तर शकील 57 धावांवर खेळत होता.
सकाळी झालेल्या पावसामुळे मैदानावर काही ठिकाणी पाण्याचे पॅचेस तयार झाले होते. ते सुकल्यानंतर सामना साडेचार तास उशिराने सुरू झाल्याने 41 षटकांचा खेळ होऊ शकला. ढगाळ वातावरण असल्यामुळे बांगलादेशने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांचे वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लाम व हसन मेहमुद यांनी अप्रतिम स्विंग मारा करीत हा निर्णय सार्थ ठरवित पाकची स्थिती नवव्या षटकातच 3 बाद 16 अशी केली. सलामीवीर अब्दुल्ला शफीकला हसनने 2 धावांवर बाद केले तर कर्णधार शान मसूद 6 धावा काढून बाद झाला. शोरिफुलने त्याला बाद केले. शोरिफुलने नंतर माजी कर्णधार बाबर आझमला शून्यावरच बाद केले.
मसूदची नाराजी
कर्णधार मसूद यष्टीमागे झेलबाद झाल्यावर पंचांच्या निर्णयावर त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पंचांशी हुज्जतही घातली. मैदानी पंचांनी त्याला नाबाद ठरविले होते. पण बांगलादेशने रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी त्याला बाद ठरविल्यानंतर तो खूपच निराश झाला. पंचांशी चर्चा केल्यानंतर तो तंबूत परतला. पण या वर्तनाबद्दल त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अयुब व उपकर्णधार शकील यांनी शानदार अर्धशतके नोंदवत चौथ्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी करीत पाकचा डाव सावरला. हसन मेहमुदने शेवटच्या सत्रात ही जोडी फोडताना अयुबला तिसऱ्या स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. 98 चेंडूंच्या खेळीत त्याने 4 चौकार व एक षटकार मारला. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मोहम्म रिझवान शकीलसह 24 धावांवर खेळत होता. शकीलने 92 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 97 धावा केल्या तर रिझवानने 31 चेंडूत 2 चौकार मारले. बांगलादेशच्या शोरिफुल व हसन मेहमुद यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.
पाकचा माजी कर्णधार बाबर आझमचा खराब फॉर्म सलग सातव्या कसोटीतही कायम राहिला. त्याने शोरिफुलला लेगसाईडला फ्लिक केले. पण यष्टिरक्षक लिटन दासने त्याचा डावीकडे झेपावत अप्रतिम झेल टिपला. बाबरला खातेही खोलता आले नाही. पण शकील व अयुब यांनी बांगलादेशचा वेगवान व स्पिन मारा व्यवस्थित खेळून काढत अर्धशतके नोंदवली. स्पिनविरुद्ध त्यांनी स्वीप शॉटचा सढळ वापर केला.
या दोन संघांत दोन कसोटी होणार असून त्या कसोटी चॅम्पियनशिप सायकलमधील आहेत. या चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तान सहाव्या तर बांगलादेश आठव्या स्थानावर आहे. विंडीज संघ त्यांच्यापेक्षा खालच्या क्रमांकावर आहे. रावळपिंडीतच दुसरी कसोटीही होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान प.डाव 41 षटकांत 4 बाद 158 : शफीक 2, सईम अयुब 98 चेंडूत 56, शान मसूद 6, बाबर आझम 0, सौद शकील खेळत आहे 92 चेंडूत नाबाद 57, मोहम्मद रिझवान 31 चेंडूत नाबाद 24, अवांतर 13. गोलंदाजी : शोरिफुल इस्लाम 2-30, हसन मेहमुद 2-33.