For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभ्यासपूर्ण इतिहास विवेचन करणारा ‘अयोध्या’ नाट्याप्रयोग

06:22 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
अभ्यासपूर्ण इतिहास विवेचन करणारा ‘अयोध्या’ नाट्याप्रयोग
Advertisement

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ फौंडेशनतर्फे प्रयोगाचे आयोजन : आज सायंकाळी आणखी एक प्रयोग

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

अयोध्या येथे रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा सोहळा नुकताच पार पडला व पूर्ण देशाने तो अनुभवला. मात्र अयोध्या म्हणजेच अ-युद्धभूमी आहे, इथपासून या भूमीच्या पोटी काही काळ वनवास येणार आहे. याची खुद्द श्रीरामांना कल्पना होती, ते अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी किती जणांचे योगदान लाभले, किती जणांच्या प्राणांची बाजी लागली इथपर्यंतचा अभ्यासपूर्ण इतिहास विवेचन करणारा ‘अयोध्या’ हा नाट्याप्रयोग शनिवारी मालिनीसिटी येथे पार पडला.

Advertisement

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ फौंडेशन व रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रयोग झाला. रविवारी सायंकाळी आणखी एक प्रयोग होणार असून या प्रयोगातील निधी बेळगावमध्ये रक्तपेढी उभारण्यासाठी खर्च केला जाणार आहे.

प्रयोगाची सुरुवात श्रीरामांचे अयोध्येमध्ये आगमन झाल्याच्या घटनेने

‘अयोध्या या महानाट्यात’ नाट्या, नृत्य, संगीत आणि ग्राफीक्स यांचा वापर  करण्यात आला आहे. राम मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ असून, न्याय मर्यादा, त्याग आणि तत्व यांचा वस्तूपाठ आहे. याचे प्रत्यंतर या प्रयोगातून येते. प्रयोगाची सुरुवात श्रीरामांचे अयोध्येमध्ये आगमन झाल्याच्या घटनेने होते. आपल्या राजमहलाच्या सौदावरुन अयोध्यानगरीला संचितपणे न्याहाळणारे श्रीराम आणि जानकी यांच्या संवादातून श्रीराम चिंतीत का आहेत? हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु प्रयोग संपताना याचे उत्तर नक्कीच मिळते.

कलाकारांनी अभिनयाने प्रयोगात भरला रंग

श्रीराम मंदिर अस्तित्वात असूनही अनेक आक्रमणांना अयोध्येला सामोरे जावे लागते. विक्रमादित्याने हे मंदिर निर्माण केले. परंतु बाबरने ते भुईसपाट केले. इथपासून पुढे झालेल्या अनेक घटनांचा धांडोळा येथे घेण्यात आला आहे. राम मंदिर प्रश्नी झालेल्या दंगली, कृष्णकांत नायर या अधिकाऱ्याने घेतलेली कणखर भूमिका, रथयात्रा, धर्मसंसद, शिलान्यास या घटना ग्राफीक्सच्या माध्यमातून पुढे येतात. त्याचवेळी कलाकार त्यानुरुप अभिनय करून या प्रयोगात रंग भरतात.

पाच मुख्य संत, कोठारी बंधू, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, विनय कटारी, उमा भारती, यांचे मंदिरासाठीचे प्रयत्न त्याचवेळी व्ही. पी. सिंग, मुलायम सिंग यादव, लालुप्रसाद यादव यांच्या भूमिका, बाळासाहेब ठाकरेंचा आदेश अशा महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख या प्रयोगात झाल्याने नेमका इतिहास प्रेक्षकांच्या लक्षात येतो आणि ‘सौगंध राम की खायेंगे, मंदिर वही बनाएंगे’ ही प्रतीज्ञा करणाऱ्या आणि त्यासाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असल्याची जाणीव होते.

ग्राफीक्सच्या माध्यमातून उलगडला इतिहास

ग्राफीक्सच्या माध्यमातून हा इतिहास उलगडला जात असला तरी अयोध्यानगरीचे स्वरुप, शरयुचे विस्तीर्ण पात्र, भगवा फडकल्याची घटना, कोठारी बंधूंचे व कार सेवकांचे दहन होण्याचा प्रसंग आणि आदेशाच्या पार्श्वभूमीवर मनगटात रुद्राक्ष असलेला पुढे आलेला बाळासाहेब ठाकरेंचा हात विशेष उल्लेखनीय होय. हे सर्व ग्राफीक्स ईशान देसाई याने केले आहे.

प्रयोगाच्या प्रारंभी क्लबचे अध्यक्ष विजय दरगशेट्टी यांनी स्वागत केले. संयोजक चैतन्य कुलकर्णी यांनी प्रयोगाचा हेतू स्पष्ट केला व लेखक केदार देसाई व निर्माते प्रणय तेली यांचा सत्कार केला. प्रायोजक बिर्ला स्कूल, ओरीओऑनिस, क्रिश, चितळे डेअरी, पीएनजी यांच्या पदाधिकाऱ्यांचा माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी, रो. संजीव नाईक, संजय देशपांडे, मनोज सुतार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रेणू कुलकर्णी यांनी केले.

योगदान दिलेल्यांचे विस्मरण होता कामा नये-केदार देसाई

या प्रयोगाची संकल्पना कशी सुचली या प्रश्नावर केदार देसाई यांनी रामायण घडले, वनवास घडला, राम राज्याभिषेक झाला आणि आता मंदिर उभे राहिले, इतपतच लोकांना माहिती आहे. परंतु त्या मागचा पूर्ण इतिहास आणि वास्तव कळणे आवश्यक आहे, असे वाटले आणि महिनाभर विचार करून अवघ्या दोन दिवसांत प्रयोगाचे लेखन केले, असे ते म्हणाले. यात काही वादग्रस्त घटना आहेत, याकडे लक्ष वेधता प्रयोगात जे सादरीकरण आहे. त्या सर्वांचे पुरावे असून तेवढ्याच घटना मांडल्या आहेत. कारण ज्यांनी योगदान दिले त्यांचे विस्मरण होता कामा नये, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.