अयोध्या आणि राष्ट्रीय पुनर्जागरणाची प्रक्रिया
अयोध्या येथे प्रभू रामचंद्राच्या मंदिराची स्थापना गतवर्षी रामनवमीस करण्यात आली. यावर्षी 22 नोव्हेंबर रोजी संपूर्ण मंदिराच्या स्थापनेचा संकल्प पूर्ण झाला आणि मंदिरस्थळी धर्मध्वज फडकविण्यात आला. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण हे खरोखरच राष्ट्रीय प्रबोधन प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या भाषणातील विचारमंथन हे भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठ मूल्यांवर आधारलेले आहे. प्रभू रामचंद्रांचा इतिहास हा मूल्य प्रेरणांचा इतिहास आहे.
इतिहासकारांनी आजवर सत्य दडपून ठेवले आणि आपणास इतिहासाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवले. आपली मुळे कापून टाकण्यात आली आणि आपल्या परंपरांचा आपणास विसर पडावा अशी परिस्थिती लॉर्ड मेकॉले यांच्यासारख्या वसाहतवादी विचारवंतांनी तयार केली. दुर्दैवाने त्यांचा मार्ग पुढे अनेक इतिहासकारांनी तसाच अनुसरला. आता आपणास आपल्या इतिहासाकडे, परंपरांकडे आणि आपल्या प्राचीन वीर पुरुषांच्या इतिहासाकडे सुद्धा नव्याने पाहण्याची गरज आहे. या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घडविलेले विचारमंथन खरोखरच डोळ्यात अंजन घालणारे आहे.
सोनियाचा दिनु आजी बरसे अमृताचा घनू
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीचे दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आणि आता मंदिराचा परिपूर्ण विकास झाला आहे. त्याचा परिसर नित्य नवनवीन, एक सुंदर आणि तेवढ्याच प्रभावशाली मंदिरांनी नटलेला आहे. याप्रसंगी मंदिराच्या कळसावर धर्मध्वज म्हणजे भगवा ध्वज पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते फडकविण्यात आला. याप्रसंगी त्यांनी केलेले 31 मिनिटांचे भाषण हे खरोखरच संपूर्ण देशाला नवी दिशा देणारे, नवी प्रेरणा देणारे ठरले आहे. त्यांनी आपल्या भाषणातून घडविलेले चिंतन हे त्यांच्या विचारमंथनाचे प्रतिबिंब आहे.
मंदिराच्या कामाची पूर्णता म्हणजे एक ऐतिहासिक क्षण आहे, या शब्दात त्यांनी या परिपूर्तीचा आनंद व्यक्त केला. त्यांच्या मते, अयोध्या शहर मंदिराचे शिखर पाहून आणखी एका सुवर्ण क्षणाचा साक्षीदार बनले आहे. संपूर्ण भारत वर्षात संपूर्ण जगात प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रत्येक जण लीन झाला आहे, पावन झाला आहे. प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात अतुलनीय असे समाधान प्रकट होत आहे तसेच आपण सारे कृतज्ञ भावात डुंबलेलो आहोत. शतकानुशतके आमच्या पायातील साखळ्या निखळून पडल्या आहेत आणि शतकानुशतके केलेल्या संकल्पाची आज परिपूर्ती होत आहे. त्यामुळे सोनियाचा दिनु आजी बरसे अमृताचा घनु, असे या क्षणाचे वर्णन करावे लागेल. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या न्यायाने प्रत्येक रामभक्ताच्या आनंदाला आता आकाश ठेंगणे झाले आहे.
ज्या परिपूर्तीसाठी, यशोगाथेसाठी गेली पाचशे वर्षे आम्ही झगडत होतो, संघर्ष करत होतो. या भव्य, दिव्य आणि तेजस्वी यज्ञातून आजचा हा धर्मध्वज उभारणीचा मंगलमय क्षण उदयास आला आहे, असा आनंद व्यक्त करून पंतप्रधानांनी धर्मध्वजाचा नवा अर्थ सांगितला. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी धर्मध्वजाचा जो नवा अर्थ सांगितला, तो खरोखरच अद्भुत आणि प्रेरक आहे. त्यांच्यामध्ये हा धर्मध्वज फक्त एका अर्थाने केवळ ध्वज नाही. हा भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा एक महत्त्वाचा मानबिंदू आहे, प्रतीक आहे. त्याचा भगवा रंग, त्यावर चित्रित सूर्यवंशाचे वैभव हे तेजस्वी असून, त्यावर कोरलेले ओम हे चिन्ह आणि त्यातून प्रकटलेला कोविदार वृक्ष हे रामराज्याचे वैभव दर्शवितात. या प्रतीकांचा अर्थ असा की, हा एक नवा संकल्प आहे. हा ध्वज जणू यज्ञाचे प्रतीक आहे. हा ध्वज संघर्षातून निर्माण होणारी यशाची कहाणी दर्शविणारा आहे. हा ध्वज शतकानुशतके चालू असलेल्या स्वप्नांचे प्रकट रूप आहे. संघर्षाची यशोगाथा आहे. हा ध्वज संतांच्या तपश्चर्येचे फलित आहे आणि समाजाच्या सहभागाची फलदायी परिणामस्वरूप प्रक्रिया आहे. येणाऱ्या काळात शतकानुशतके आणि सहस्रावधी लोकांकरिता हा एक धर्मध्वज अशा भावनेचे प्रकटीकरण करणारा आहे की, त्यात प्रभू रामचंद्रांचे आदर्श आणि तत्वेही अंकित झालेली आहेत. हा धर्मध्वज अशी घोषणा करणारा आहे की, त्यातून प्रकटणारे सूर हे ‘सत्यमेव जयते’ या तत्त्वाचा घोष करणारे आहेत म्हणजेच फक्त सत्याचा विजय होतो आणि असत्याचा नाही असे सांगणारा हा धर्मध्वज आहे. त्याची घोषणा अनंत आकाशात निनादत आहे. सत्य हे ब्रह्मस्वरूप असते आणि धर्म हा सत्यामध्ये प्रकट होतो. तो सत्याच्या रूपाने प्रस्थापित झालेला असतो, असा याचा अर्थ आहे. ‘प्राण जाय पर वचन न जाय’ म्हणजे प्राण गेला तरी बेहत्तर पण विश्वास टिकला पाहिजे, या भावनेचे प्रतिबिंब या ध्वजामध्ये उमटले आहे. हा धर्मध्वज संघर्ष, सेवा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. कर्मप्रधान विश्व विचारांची उंची वाढविणारा असा हा धर्मध्वज आहे. हा धर्मध्वज इच्छा, आशा, आकांक्षा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. समाजात शांती आणि आनंदभाव जागविणे, हेच रामराज्याचे खरे स्वप्न होते. हा धर्मध्वज आपल्याला संकल्प करायला लावतो तसेच ते संकल्प सिद्धीस कसे न्यावयाचे, याबाबत मार्गदर्शनही करतो, म्हणजेच आपणास असा शोषणमुक्त समाज निर्माण करावयाचा आहे की, जिथे गरिबी नसेल आणि जिथे दु:खी किंवा कष्टी असा एकही माणूस नसेल.शोषणमुक्त, कृषी, औद्योगिक समाजाची निर्मिती करणे हे रामराज्याचे अंतिम उद्दिष्ट होते. जो कोणी रामलल्लाच्या स्थळाचे दर्शन घेतो तो युगानुयुगे भगवान श्रीरामाचे आदर्श आणि प्रेरणा यांना संपूर्णपणे स्वीकारतो आणि तो मानवतेपर्यंत पोहोचवितो. या अविस्मरणीय क्षणासाठी, प्रसंगासाठी जगभरातील कोट्यावधी रामभक्त वाट पाहत होते, त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी सर्व राम भक्तांच्या मनात एक नवा विश्वास तयार केला. राम मंदिराच्या बांधकामासाठी सहकार्य करणाऱ्या सक्रिय पाठिंबा देणाऱ्या कोट्यावधी देणगीदारांचे आभार मानून त्यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी समर्पण करणाऱ्या प्रत्येक कामगाराचे, कारागिराचे आणि तंत्रज्ञांचे त्यांनी अभिनंदन केले. श्रीरामाचे चरित्र हे भारतीय इतिहासाच्या, भारतीय महाकाव्यांच्या आणि पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या साधनेतून आणि त्यांच्या ज्ञान परंपरेतून निर्माण झाले आहे.
श्रीरामचरित्र मूल्यप्रेरणा
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी श्रीराम चरित्रातील तेजस्वी मूल्यप्रेरणांचा शोध घेतला आणि त्यांची मांडणी केली. युवराज श्रीराम ते मर्यादा पुरुषोत्तम असा संपूर्ण प्रवास अयोध्येच्या परिसरात घडवून आला आहे. अयोध्या ही या इतिहासाचे साक्षीदार बनली आहे. त्यामुळे या परिसरात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाला या दिव्य तेजाचा स्पर्श होणार आहे. महर्षी वशिष्ठांचे ज्ञान, वैभव तसेच महर्षी विश्वामित्रांची दीक्षा, तपश्चर्या, महर्षी अगस्तींचे करारी मार्गदर्शन आणि निषाद राजाची सक्रिय मैत्री तसेच माता शबरीची ममता, वीर हनुमानाची भक्ती आणि निष्ठा अशा असंख्य महावीरांच्या योगदानाचा मोलाचा वाटा रामचरित्रात दिसतो. त्यामुळे मंदिराच्या परिसरात त्यांची भव्य-दिव्य मंदिरे उभारण्यात आली आहेत. अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या या पुण्यभूमीस कोट्यावधी लोक भेट देत आहेत. त्यातून जो निधी उभा राहील, त्याचा सदुपयोग करून न्यासाने या भागात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे श्रीराम विद्यापीठ स्थापन करावे म्हणजे त्यामुळे ज्ञान-विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात भारत नवे मानदंड प्रस्थापित करू शकेल. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिलेला अयोध्येचा खरा संदेश काय असेल तर तो पुनर्जागरणाचा आहे, नवनिर्माणाचा आहे आणि राष्ट्रीय चेतनेचाही आहे.
अयोध्येचा खरा संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला अयोध्येचा खरा संदेश काय असेल तर विकसित भारताच्या उभारणीसाठी समाजाची सक्रिय सामूहिक शक्ती उभारणे आवश्यक आहे, हा आहे. राम मंदिराच्या दिव्य शक्तीतून देखील भारताच्या सामूहिक क्षमतेचे चेतनादायी केंद्र विकसित झाले आहे. येथे सहा मंदिरे बांधण्यात आली आहेत. येथे माता शबरीचे मंदिर हे आमच्या आदिवासी बांधवांच्या प्रेम आणि आदरातिथ्य त्याच्या परंपरेचे मूर्त स्वरूप आहे. ऋषीमुनींची मंदिरे ज्ञानपरंपरेचे प्रतीक आहेत. निषादराजांचे मंदिर हे मैत्रीचे साक्षीदार आहे. त्यातून केवळ साधनाची नाही तर प्रेम, मैत्री व दया या उद्देशांची दिव्य भावना प्रकट झाली आहे. येथे अहिल्या माता तसेच जटायू आणि खारीच्या मूर्ती सुद्धा उभारण्यात आल्या आहेत. मोठ्या संकल्पासाठी प्रत्येकाचा लहानातल्या लहान व्यक्तीचा सुद्धा सहभाग किती महत्त्वाचा असतो, याचा संदेश ही मंदिरे देतील. देशातील नागरिक जेव्हा राम मंदिराला भेट देतात, तेव्हा त्यांनी सात मंदिरांचे दर्शन घेतले पाहिजे आणि ही मंदिरे केवळ आपल्या श्रद्धेचीच नव्हे तर मैत्री, कर्तव्य आणि सामाजिक सौहार्द भावाचे, मूल्यप्रेरणांचे प्रतीक बनली आहेत. आम्हाला केवळ पूर्वज प्रिय नाहीत, तर मूल्ये प्रिय आहेत. आम्ही समाजाला एका विचारतत्त्वाने, समतेच्या भावनेने एकत्र बांधू इच्छितो अशी सहकार्याची भावना कशी रुजवावी हे आपण प्रभुरामांच्या चरित्रातून शिकले पाहिजे. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे गेल्या अकरा वर्षांत महिला, दलित, मागासवर्गीय समाजाच्या सर्व स्तरातील लोकांच्या कल्याणासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आदिवासी, वंचित, शेतकरी, कामगार, तरुण प्रत्येकाला देशाच्या उभारणीत कटिबद्ध व्हावयाचे आहे. देश जेव्हा शंभर वर्षे पूर्ण करेल, तेव्हा आपण एक मोठा पल्ला गाठलेला असेल. प्रत्येकाने आपल्या सक्रिय योगदानातून देशासाठी काहीतरी रचनात्मक कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे. कारण जेव्हा आपण येथे नव्हतो, तेव्हाही राष्ट्र होते आणि जेव्हा आपण नसू, तेव्हाही बलशाली राष्ट्र खंबीरपणे उभे असले पाहिजे, असाच प्रभू रामचरित्राचा संदेश आहे. भारतीय समाज हा एक जीवंत समाज आहे, गतिमान समाज आहे. आपल्याला दूरदृष्टीने काम करावे लागेल. आपल्या प्रत्येक कृतीतून देशाच्या प्रगतीचा विचार केला पाहिजे तसेच आपण त्यासाठी आपल्या भावना आणि आपल्या प्रेरणा रामाकडून घेतल्या पाहिजेत. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे व्यक्तिमत्व समजून घ्यावे लागेल. कारण आपल्याला त्यांचे वर्तन आत्मसात केले तरच प्रगतीच्या नव्या दिशा अधिक तेजस्वीपणे प्रकट होऊ शकतील.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर