आयेशाचे कट्टरपंथी जिहादी रॅकेटशी लागेबंध
उत्तर प्रदेश पोलिसांनी गोव्यात केली होती अटक : आर्थिक व्यवस्थापक म्हणून होती कार्यरत
पणजी : काही दिवसापूर्वी गोव्यात अटक केलेल्या आयेशा उर्फ एस. बी. कृष्णा उर्फ निकी हिचे देशभरात धर्मांतर घडवणाऱ्या कट्टरपंथी जिहादी रॅकेटशी लागेबंध असल्याचे उघड झाले आहे. कट्टरपंथी जिहादी रॅकेटमध्ये ती आर्थिक व्यवस्थापक (फंड मॅनेजर) असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गोव्यातही आतंकवादी संघटनांत काम करणाऱ्या लोकांचे वास्तव्य असल्याचे उघड झाल्याने लोकांमध्ये खळबळ माजली आहे. आयेशाचा स्वत:चा फ्लॅट ओल्ड गोवा येथे आहे. ती गेल्या काही वर्षांपासून येथे राहत होती. तिचे वडील माजी लष्करी अधिकारी (सुभेदार) असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने गोव्यात खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणांनीही सतर्कता वाढवली आहे. या रॅकेटची गुंतवणूक, स्थानिक संपर्क आणि पुढील घडामोडी यावर अधिक लक्ष ठेवले जात आहे.
गोवा बनतो गुन्हेगारांच्या आश्रयाचे स्थान
गोवा पोलिस कॉम्बिंग ऑपरेशन तसेच गोव्यात राहणाऱ्या गुन्हेगारी लोकांना शोधण्यासाठी मोहीम राबवत आहेत, मात्र आतंकवाद्याशी संबंधित लोक गोव्यात राहतात आणि पोलिसांच्या नजरेतून कसे चुकतात, असा सवाल निर्माण झाला आहे. परराज्यातील पोलिस गोव्यात येऊन त्यांना अटक करतात तेव्हा गोवा पोलिसांचे डोळे उघडतात. त्यामुळे गोवा पोलिस किती सतर्क आहे, हे दिसून येते. ही एक चिंतेची बाब आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. देशभरातील गुन्हेगार आश्रयासाठी गोव्यात येऊन राहतात गोवा पोलिसांना त्याचा पत्ताच नसतो. संबंधित ठिकाणाचे पोलिस गोव्यात येऊन त्यांना अटक करतात तेव्हा त्या व्यक्तीबाबत गोवा पोलिसांना माहिती मिळते. त्यामुळे आता गोव्यातही असुरक्षा निर्माण झाली की काय, अशी भीती वाटू लागली आहे.
आणखी नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या
बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी गेल्या शुक्रवारी ओल्ड गोवा येथे आयेशा हिला अटक केली होती. ती मूळची ओडिशाची असून सध्या गोव्यात सांतआंद्रे भागात भाड्याच्या घरात राहत होती. अटक होण्याआधी काही दिवसापूर्वी ती कुटुंबियांसमवेत ओल्ड गोवा येथील एका फ्लॅटमध्ये स्थायिक झाली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्यासह तिच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी नेण्यात आले होते. तिच्यासह या कामात गुंतलेल्या इतर 9 जणांच्या देखील मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
आयेशाच्या पतीचेही रॅकेटशी लागेबंध
ही कारवाई उत्तर प्रदेश पोलिसांनी राबवलेल्या ’मिशन अस्मिता’ मोहिमेंतर्गत करण्यात आली आहे. या रॅकेटसाठी युएई, अमेरिका, कॅनडा व लंडन येथून आलेले कोट्यावधी ऊपये आयेशाच्या खात्यांमध्ये जमा व्हायचे, ती ही रक्कम भारतात धर्मांतर आणि ब्रेनवॉशिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या खात्यांमध्ये वर्ग करत होती. सैय्यद दाउद अहमद हा कॅनडामधून निधी पाठवायचा, अशी खळबळजनक माहिती तपासात समोर आली आहे. या रॅकेटचे लागेबांधे दहशतवादी गट लष्कर-ए-तैय्यबाशी असल्याचे देखील तपासात स्पष्ट झाले आहे. आयेशाचा पती अली हसन ऊर्फ शेखर राय हा कोलकात्याचा रहिवासी असून, तेथील एका न्यायालयात कर्मचारी आहे. तो या रॅकेटचा ‘कायदेशीर सल्लागार’ म्हणून कार्य करत होता. धर्मांतरासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर अडचणी टाळण्याचे काम त्याच्याकडे होते.
अल्पवयीन मुलींना धर्मांतरासाठी प्रवृत्त करत होते
कॅनडातून सैय्यद दाऊद अहमद या व्यक्तीकडून आयेशाच्या खात्यांमध्ये नियमितपणे रक्कम पाठवली जात होती. ही रक्कम भारतात हवालामार्फत इतर सदस्यांपर्यंत पोहोचवली जात होती. दाऊद सोशल मीडियावर जिहादी प्रचारासाठी व्हिडिओ तयार करून त्याचे प्रसारण करत होता. या नेटवर्कमध्ये सर्वात मोठा सूत्रधार हा आग्राचा अल रहमान कुरैशी असून, तो युट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना धर्मांतरासाठी प्रवृत्त करत होता. त्याच्यासोबत पकडलेला कोलकात्याचा ओसामा या मुलींना त्यांच्या कुटुंबांपासून विभक्त करण्याचे काम करत होता.