आंध्र विधानसभा अध्यक्षपदी अयनापत्रुदू
वृत्तसंस्था / अमरावती
आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी तेलगु देशम पक्षाचे आमदार सी. अयनापत्रुदू यांनी निवड करण्यात आली आहे. ते नरसीपट्टणम या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे मतदान घेण्याची वेळ आली नाही. त्यांच्या निवडीआधी आमदार बुतचैय्या चौधरी यांची अस्थायी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अयनापत्रुदू यांची निर्विरोध निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर कामकाजाला प्रारंभ झाला.
अयनापत्रुदू यांची निवड झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे इतर सहकारी यांनी सन्मानाने त्यांच्या आसनापर्यंत नेले. नंतर अयनापत्रुदू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. नव्या विधानसभेच्या प्रथम भाषणात चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभा अध्यक्षांची प्रशंसा केली. ते या सभागृहाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्या पदाचे उत्तरदायित्व ते सभागृहाच्या उदात्त परंपरांना अनुसरुन सांभाळतील असा विश्वास नायडू यांनी भाषणात व्यक्त केला.