‘अॅक्सिओम’ची अंतराळात यशस्वी झेप
शुभांशू शुक्ला ठरला 41 वर्षांमधील पहिला भारतीय अंतराळवीर, आज पोहचणार अवकाश स्थानकात
वृत्तसंस्था/ फ्लोरिडा, नवी दिल्ली
‘अॅक्सिओम-4’ अंतराळ अभियान चारवेळा पुढे ढकलल्यानंतर अखेर यशस्वी ठरले आहे. या यानाने बुधवारी दुपारी अंतराळात यशस्वी झेप घेतली आहे. परिणामी, या यानातील भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला, गेल्या 41 वर्षांमधील पहिला भारतीय अंतराळवीर ठरला आहे. आज गुरुवारी हे यान अंतराळातील स्थानकाशी जोडले जाणार असून शुभांशू शुक्ला आपल्या अन्य तीन सहकाऱ्यांसह या स्थानकात प्रवेश करणार आहे. महत्वाची बाब अशी की, शुभांशू शुक्ला हे या अभियानाचे ग्रुप कॅप्टन आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशासाठी त्याचे अभिनंदन केले आहे. ‘जय हिंद, जय भारत’ असा संदेश शुभांशू शुक्ला याने पाठविला आहे.

‘अॅक्सिओम-4’ या अंतराळ यानात शुभांशू शुक्लासह ज्येष्ठ अंतराळवीर पेगी व्हिटसन (अमेरिका), स्लावोत्झ उझनान्स्की (पोलंड) आणि तिबोर कापू (हंगेरी) हे अन्य तीन अंतराळवीर आहेत. त्यांच्यापैकी उझनान्स्की हे इंजिनिअर असून कापू हे अंतराळ संशोधक आहेत. या यानाचे प्रक्षेपण अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रावरून करण्यात आले. खासगी कंपनी स्पेस एक्स च्या ‘फाल्कन 9’ या अग्निबाणाच्या साहाय्याने या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. अंतराळवीरांचे हे दल स्पेस एक्सच्या नव्या ड्रॅगन अंतराळयानातून अवकाश प्रयोगशाळेपर्यंत प्रवास करणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार साधारणत: गुरुवारी दुपारी साडेचार वाजता ते या अंतराळ स्थानकाच्या प्रयोगशाळेत प्रवेश करतील, अशी माहिती देण्यात आली.

शुभांशू शुक्लाचा भावोत्कट संदेश
यानाने अवकाश भरारी घेऊन ते त्याच्या कक्षेत स्थिरावल्यानंतर भारताचा अंतराळवीर शुभांशू शुक्ला याने तेथून अनेक संदेश पाठविले आहेत. यानात मी एकटाच नाही. माझ्यासह सर्व भारत या अंतराळ प्रवासात सहभागी झाला आहे, असा भावोत्कट संदेश त्याने पाठविला आहे. या यानाचे प्रक्षेपण चारवेळा तांत्रिक दोषांमुळे पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे साऱ्यांचीच उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, आता या अभियानाचा प्रथम टप्पा यशस्वी झाल्याने शुक्ला याचे माता-पिता, पत्नी, अन्य कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कोट्यावधी भारतीयांच्या आनंदाला पारावर उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.
ट्रान्स्फर टनेलची समस्या
यानातून होणारी इंधनाची गळती आणि ट्रान्स्फर टनेलमधील दाबाची समस्या यांच्यामुळे या यानाचे प्रक्षेपण चारवेळा पुढे ढकलण्यात आले होते. अखेर अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा आणि रशियाची अवकाश संशोधन संस्था रॉसकॉसमॉस यांच्या तंत्रज्ञांनी यानाच्या ट्रान्स्फर टनेलमधील हवेचा दाब कमी करून तो 100 एमएम मर्क्युरी इतका केला. तसेच इंधन गळतीची समस्या दूर केली. त्यानंतर यानाचे प्रक्षेपण करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.
पुढचा टप्पा निर्णायक...
यानाचे प्रक्षेपण हा महत्वाचा टप्पा मानला जातो. तथापि, यापुढचा अंतराळ स्थानकात प्रवेश करण्याचा टप्पा निर्णायक ठरणार आहे. यान स्थानकाशी जोडणे हे तांत्रिक कौशल्याचे आणि अचूक वेळ साधण्याचे काम आहे. यान स्थानकाशी जोडले गेल्यानंतर लगेच अंतराळवीरांना स्थानकात प्रवेश करु दिला जात नाही. प्रथम इंधन गळती होत नाही ना, हे पाहिले जाते. त्यानंतर ट्रान्स्फर टनेलमधील हवेचा दाब योग्य असल्याची चाचणी केली जाते. नंतर या टनेलमधून अंतराळवीर स्थानकात प्रवेश करतात. ही प्रक्रिया आठ ते दहा मिनिटांची असते. अंतराळवीरांनी स्थानकात, अर्थात प्रयोगशाळेत प्रवेश केल्यानंतर हे अभियान निम्मे पूर्ण झाले असे मानण्यात येते. अंतराळ स्थानकात पूर्ण निर्धारित कालावधीचे वास्तव्य केल्यानंतर अंतराळवीरांना पृथ्वीवर सुखरुप परत आणल्यानंतरच हे अभियान पूर्ण यशस्वी झाले, असे मानले जाते, अशी माहिती देण्यात आली आहे.
काय म्हणाले राकेश शर्मा
एक्केचाळीस वर्षांपूर्वी रशियाच्या अंतराळ यानातून अंतराळ प्रवास केलेले प्रथम भारतीय कॅप्टन राकेश शर्मा यांनी शुभांशू शुक्ला याच्या यशस्वी अंतराळभरारीवर आनंद व्यक्त केला आहे. ‘अंतराळ वास्तव्य ते अंतराळ स्थानक वास्तव्य’ असा हा प्रगतीचा प्रवास असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ‘तुझे भाग्य थोर, म्हणून तुला ही संधी मिळाली आहे. अवकाशातील अद्भूत अनुभवांच्या या आनंदात तू मनसोक्त न्हाऊन घे. अंतराळ प्रवास करत असताना सातत्याने यानाच्या खिडकीबाहेर पहात रहा,’ असा संदेश शर्मा यांनी प्रक्षेपणाच्या आधी दिला होता.
‘तुझ्यासमवेत 140 कोटी भारतीयांचा आकांक्षा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशू शुक्ला याला यशस्वी प्रक्षेपणानंतर शुभेच्छा संदेश पाठविला आहे. तुझ्या अंतराळ प्रवासात आणि वास्तव्यात तुझ्या समवेत 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आहेत. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे अवकाश स्थानकात प्रवेश करणारे प्रथम भारतीय ठरणार आहेत. त्यांच्यासह 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा, आशा आणि आकांक्षा आहेत. त्यांच्यासह या अभियानातील सर्व अंतराळवीरांना मी शुभेच्छा देतो, असा संदेश त्यांनी दिला आहे.
भारताच्या महत्वाकांक्षांचे प्रतिनिधी
भारतानेही गेल्या 10 वर्षांमध्ये अवकाश संशोधन क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. भारताची इस्रो ही अवकाश संशोधन संस्था भविष्यात अनेक महत्वाचे आणि जटील अवकाश संशोधन प्रकल्प हाती घेणार आहे. त्यामुळे या अभियानावर इस्रोचेही बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे भारताच्या भविष्यकालीन अवकाश महत्वाकांक्षांचे प्रतिनिधी म्हणून गणले जात आहेत.
असे आहेत चार अंतराळवीर
- ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला : 39 वर्षांचे शुभांशू शुक्ला हे या अभियानाचे प्रमुख अंतराळवीर आहेत. त्यांचे वास्तव्य लखनौ येथे आहे. 1999 च्या कारगिल युद्धामुळे त्यांना सेनाप्रशिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा अकादमीची (एनडीए) प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण करून या अकादमीतून सेनाप्रशिक्षण आणि बीएससी (संगणकशास्त्र) अशा पदव्या प्राप्त केल्या. 2006 मध्ये त्यांनी विमानचालनाचे प्रशिक्षण घेतले आणि भारतीय वायुदलात प्रवेश केला. वायुदलात त्यांनी मिग 21, मिग 29, जॅग्वार, सुखोई आदी विमाने चालविली. नंतर त्यांनी इस्रोचे अंतराळवीर म्हणून काम केले. आता ते या अभियानाचे प्रमुख आहेत.
- पेगी व्हिटसन- 65 वर्षांच्या पेगी व्हिटसन या जगातील सर्वात अनुभवी अंतराळवीरांपैकी एक आहेत. त्यांनी नासाच्या अंतराळवीर म्हणून अनेक वर्षे काम करून निवृत्ती घेतली आहे. त्या बायोकेमिस्ट्रीतील संशोधक आहेत. 2002 मध्ये त्यांनी नासाच्या अंतराळ स्थानकात प्रदीर्घ काळ वास्तव्य केले होते. अंतराळ स्थानकाचे नेतृत्व दोनदा करणाऱ्या त्या एकमेव महिला अंतराळवीर आहेत.
- स्लावोत्झ उझनान्स्की- 41 वर्षीय स्लावोत्झ उझनान्स्की हे पोलंड देशाचे नागरिक असून ते इंजिनिअर आहेत. ते युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये अंतराळवीर आणि इंजिनिअर म्हणून काम करतात. अंतराळात प्रवास करणारे ते या देशाचे दुसरे अंतराळवीर आहेत. अंतराळात पोहचलेले जगातील प्रथम अंतराळवीर रशियाचे युरी गागारिन हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. त्यांनी 2013 मध्ये युरोपियन अणुसंशोधन संस्थेत सेवा केली आहे. त्यानंतर त्यांनी अवकाश संशोधनाशी संबंधित अनेक संस्थांमध्ये काम केले. अवकाश प्रवासाचा त्यांना अनुभव आहे.
- तिबोर कापू- तिबोर कापू हे हंगेरी या देशाचे नागरिक असून मेकॅनिकल इंजिनिअर आणि अंतराळवीर म्हणून काम करतात. ‘लॉजिक गेम’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे ते दोनवेळा रौप्यपदक विजेते आहेत. 2023 मध्ये त्यांनी हंगेरीच्या अवकाश अभियानाच्या माध्यमातून अंतराळ प्रवास केला आहे. या अभियानातील ते सर्वात तरुण सदस्य आहेत. कुशल तंत्रज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती आहे.